बीडमधील सुमित वाघमारे हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली आहे. भररस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना पाच दिवसांनंतर पोलिसांनी अकोला परिसरातून अटक केल्याचं समजतंय. या खूनाचा कट रचणारा कृष्णा क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी काल गजाआड केले होते, त्याला अटक केल्यानंतर तपासाला गती आली आणि पोलिसांनी आता मुख्य आरोपींना बेड्या घातल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेमविवाह केल्याने बायकोच्या भावानेच सुमितची धारदार शस्त्राने हत्या केली होती. गेल्या बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बीडच्या गांधीनगर परिसरामध्ये ही घटना घडली होती. मयत सुमित वाघमारे (25) हा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. बीड शहरातील मावशीकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या सुमितचं महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भाग्यश्रीसोबत प्रेम जुळले होते. दोघांच्याही कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांच्या विरोध झुगारून भाग्यश्री आणि सुमितने लग्न केलं. बुधवारी सुमित आणि भाग्यश्री हे दोघे परीक्षेसाठी महाविद्यालयात आले होते. परीक्षा संपवून दोघेही महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच बालाजी लांडगे आणि त्याचा एक साथीदार तिथे पोहोचले. दोघेही एका कारमधून आले. त्यांनी सुमितवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले आणि पळ काढला. डोळ्यादेखत पतीवर हल्ला झाल्याने भाग्यश्रीला सुरुवातीला नेमके काय घडले हेच कळले नाही. रिक्षाचालक आणि स्थानिकांच्या मदतीने तिने पतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुमित-भाग्यश्रीने लग्न केल्याचा राग मनात ठेवून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगेने त्याची हत्या केली. लग्नानंतर भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि सुमितचा जबरदस्त वाद झाला होता. या भांडणानंतर रागाच्या भरात बालाजीने बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करत खून केला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed sumit waghmare murder case main accused balaji landage and sanket wagh arrest