लोकसत्ता वार्ताहर
अकोले : आगामी कृषी हंगामाच्या पार्श्वभूमीवर बीज माता राहीबाई पोपरे सध्या शेतकऱ्यांसाठी गावरान बियाणे निर्मितिच्या कामात मग्न आहेत.अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत देशी बियाणे पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
गावरान आणि देशी बियाण्यांच्या जतन संवर्धनासाठीचे मोठे काम त्यांनी चालविले आहे. अकोले (अहिल्यानगर)तालुक्यातील कोंभाळणे हे त्यांचे गाव. तेथे त्यांनी ५४ पिकांच्या सव्वाशे पेक्षा अधिक वाणांचे जतन केले आहे. दर वर्षी त्यात नवनवीन वाणांची भर पडत असते. बीज बँकेच्या या कामामुळेच त्यांना ‘बीजमाता’ म्हणून संबोधिले जाते. कोंभाळणे येथील त्यांची ही बियाणे बँक पहाण्यासाठी देशभरातून शेतकरी,संशोधक,विद्यार्थी येत असतात. प्रत्येक गावात अशी देशी बियाणांची बँक तयार झाली पाहिजे असे त्या सांगत असतात.गावरान बियाण्यांची निर्मिती व प्रचार प्रसार यांच्यासाठी सतत त्यांचे प्रयत्न सुरू असतात.
कोंभाळणे येथील त्यांच्या शेतातील खरीप हंगामात लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकांच्या बियांची सध्या काढणी आणि उन्हामध्ये वाळवणी या कामांना वेग आला आहे. बीज माता स्वतः शेतामध्ये वेळ देऊन शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे निर्माण करण्यामध्ये व्यस्त आहेत. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी दर्जेदार गावरान बियाणे निर्मितीवर भर दिला आहे. त्यांनी त्यासाठी आपल्या कुटुंबीयांसहित मोहीम हाती घेतली आहे. वाल , घेवडा व वाटाणा या पिकाच्याच गोड वाल,काळा वाल,तांबडा वाल, कडू वाल,हिरवा लांब घेवडा,लाल शिराचा घेवडा,चपटा घेवडा,बुटका घेवडा, वटाण्या घेवडा,गबरा घेवडा पताड्या घेवडा, लाल शेंगांचा घेवडा, हिरवा आखूड घेवडा, लाल वालवड, सफेद वालवड , श्रावण घेवडा,बुटकी वालवड, सफेद घेवडा, बुटका घेवडा लाल दाणे,बुटका घेवडा काळे दाणे,वाघ्या घेवडा,डबल बी घेवडा, पतड्या वाल अश्या सुमारे २३ वाणांची लागवड यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी केली होती.
अत्यंत दर्जेदार व सकस बियाणे सध्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. राज्य आणि परराज्यातील अनेक शेतकरी येथील बीज बँकेला भेट देऊन विविध बियाणे दरवर्षी खरेदी करत असतात.आरोग्य विषयक जागृतीमुळे लोकांचा गावठी वाणांकडे कल वाढत चालला आहे.आपल्या परसबागेसाठी बियाणे खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठी असते.कृषी खातेही त्यांचेकडून देशी वाणांचे बियाणे खरेदी करत असते.त्या मुळे तयार केलेल्या बियाणांची विक्री जागेवरच होत असते. राहीबाईंपासून प्रेरणा घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या परसबाग चळवळीमुळे अकोले तालुक्याचे नाव गावरान बियांच्या निर्मितीसाठी आता ओळखले जाऊ लागले आहे.
वाल,घेवडा या व्यतिरिक्त वांगी , टोमॅटो, मिरची, काकडी ,दुधी भोपळा, खरबूज ,कारले, लाल भोपळा ,घोसाळी ,दोडका गवार, भेंडी, मुळा, शेपू अशा विविध पिकांचे अस्सल देशी वाणही त्यांच्याकडे तयार करण्यात आले आहेत. देशातील शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध कार्यक्रमातून देशी बियाण्यांचा प्रचार व प्रसार वर्षभर राहीबाई करत असतात.
नुकत्याच त्या तेलंगणा राज्यात जाऊन आल्या. तेलंगणा बायोडायव्हर्सिटी बोर्ड आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवाला त्यांनी संबोधित केले. याशिवाय गोवा गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश कर्नाटक इत्यादी राज्यातूनही त्यांच्या बियाणाना मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत अस्सल गावरान बियाणे पोहोचवण्यासाठी बीजमाता प्रयत्नशील आहेत. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संकुले ,कृषी विद्यापीठ,कृषी संशोधन केंद्र , शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून गावरान बियाणे चळवळीला मोठे करण्यासाठी त्यांच्याकडून भरीव योगदान देण्यात येत आहे.