एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत तीन महिन्यापूर्वी बंड केल्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडाची कुणकुण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अथवा पक्षात कोणाला लागली नव्हती का? यावरती शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी भाष्य केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “एकनाथ शिंदे बंड करणार याची कुणकुण एक-दीड वर्षापूर्वीच लागली होती. त्यानंतर उद्धवजींनी त्यांना मातोश्रीवर चर्चा करण्यासाठी बोलवलं. तेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलं होते. तुम्ही जबाबदारी स्वीकारा, मी बाजूला होतो, असेही उद्धवजी म्हणाले. मात्र, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी आश्रू ढाळत, अशी कोणतीच इच्छा नसल्याचं सांगितलं होते.”
हेही वाचा : “खोका खोका करणाऱ्यांना निवडणुकीत मोठा…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले…
“महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर हेच सांगायचे, काँग्रेस राष्ट्रवादीवाले आपल्याला धोका देतील. पण, आमच्याच माणसाने पाठींत खंजीर खुपसला. शिवसेनेबरोबर कधी असे करणार नाही, असं ते आम्हाला सांगायचे. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, हीच आमची मोठी चूक झाली,” असेही आदित्य ठाकरेंची स्पष्ट केलं. ते ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या ‘मटा कॅफे’त बोलत होते.