मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला हुंकार सभा असं देखील शिवसेनेकडून संबोधलं जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे दिसत आहे. मशिदीवरील भोंगे प्रकरणातील पुढचा टप्पा म्हणून राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेत हिंदू जननायक अशी प्रतिमा निर्माण करत सभा घेतल्यानंतर औरंगाबादच्या राजकारणाला मिळालेल्या राजकीय वळणावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष्य आहे. दरम्यान, या सभेवरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीकात्मक टिप्पणी केली आहे. “आज संभाजीनगर मध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.” असं संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
तसेच, राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये काल महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांशी संवाद साधला. दरम्यान, या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी कोणी कितीही काहीजरी प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार खासदार म्हणून दिल्लीत जाणारच, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
तर, राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएमच्या दोन सदस्यांनी मतदान करण्यासाठी महाविकास आघाडीने जाहीर मदत मागितली तर ती देण्याबाबत सकारात्मक विचार करू असे, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काल नांदेड येथे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर देखील संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
“तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे.” असं संदीप देशपांडेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या बैठकीत १२ अपक्ष आमदारांसह काँग्रेसचे ३२, शिवसेनेचे ४५, राष्ट्रवादीचे ४२ आमदार उपस्थित होते. सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना निवडून आणा, ऐक्य दाखवा आणि मतदान करताना काळजी घ्या, असं शरद पवारांनी बैठकीत आमदारांना सांगितलेलं आहे.