Sandeep Naik Joined Sharad Pawar NCP : ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांना भाजपला रामराम ठोकला असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, नवी मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने त्यांनी पक्ष सोडला असल्याचं म्हटलंय. आज नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रवादी पक्षाची (शरद पवार) तुतारी हातीत घेतल्यानंतर संदीप नाईक म्हणाले, “२०१९ मध्ये परिस्थिती निर्माण झाल्याने आम्हाला निर्णय घ्यावा लागला होता. नवी मुंबईच्या विकासासाठी आम्ही निर्णय घेतला. आमच्या नवी मुंबई शहराचं हित साधलं जावं, दीर्घ आणि प्रलंबित विषय सत्तेत असल्याशिवाय निर्णय होत नाही. हे विषय नवी मुंबईच्या हिताचे आहेत, हे मार्गी लागण्याकरता त्यावेळी निर्णय घेतला गेला. परंतु, आम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर दिलेला शब्द फिरवला गेला. त्यामुळे काही अंशी माझी कोंडी झाली. माझी कोंडी झाली तरी माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे. माझ्या कार्यकर्त्यांची कोंडी झाली नाही पाहिजे.”

“नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी गावांच्या साडेबारा टक्के जमिनीचं वाटप झालं, गावकऱ्यांच्या जामिनी संपादित केल्या गेल्या. तेव्हा दी. बा. पाटील यांनी गावकऱ्यांची बाजू मांडली. तेव्हा आगरी कोळी समाजाला साडेबारा टक्के जमिनी देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला. नवी मुंबई महानगर पालिकेच्या स्थापनेनंतर नवी मुंबई शहराच्या हितासाठी प्रत्येक विषयाकरता पाठबळ देण्याचं काम शरद पवारांमुळे झालं”, असंही संदीप नाईक म्हणाले.

हेही वाचा >> गणेश नाईकांच्या खेळीने दोन्ही शिवसेनेची कोंडी

२०१२ साली झालेल्या निवडणुकीत बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांचा मंदा म्हात्रे यांनी पराभव केला होता. तर, त्यांचे पुत्र संदीप नाईक हे ऐरोली मतदार संघातून निवडून आले होते. २०१९ च्या निवडणुकीत नाईक कुटुंबीयांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत गणेश नाईक यांनाच तिकीट देण्यात आले. यामुळे संदीप नाईक यांना तिकीट नाकारले. त्यानंतर राज्यात सत्ता येऊनही नाईक यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही. तेव्हापासूनच नाईक समर्थक अस्वस्थ होते. त्यातच यंदाच्या निवडणुकीत भाजपाने गणेश नाईक यांना ऐरोली मधून तिकीट जाहीर केली तर, बेलापूरमध्ये संदीप नाईक यांना उमेदवारी नाकारत मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे अस्वस्थ झालेले संदीप नाईक यांनी वेगळी चूल मांडली आहे. 

Story img Loader