येथे आज, शनिवारपासून सुरू होत असलेल्या ९५व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनात बेळगावसह मराठी भाषकबहुल प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गेली ५० वर्षांहून अधिक काळ भिजत पडलेला सीमाप्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता धूसर दिसते आहे. येथील सीमाबांधवांनी त्याकरिता नाटय़ परिषदेच्या धुरिणांवर वादग्रस्त सीमाप्रश्नासंबंधीचा ठराव संमेलनात मंजूर करण्यासाठी दबाव आणलेला असला तरी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत ‘नरो वा कुंजरोवा’ अशीच भूमिका सध्या तरी घेतलेली आहे. नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांनी यासंबंधी परिषदेच्या विषय नियामक समितीच्या सभेत चर्चा करण्यात येईल, असे सांगून याबाबत स्पष्ट उत्तर देण्याचे शिताफीने टाळले. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होईल. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी नाटय़ संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी बेळगावात आलेल्या नाटय़ परिषद अध्यक्ष मोहन जोशी यांनी सीमावादासंबंधी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेनेही त्यांचा निषेध करत संमेलन आयोजनातून अंग काढून घेण्याचे ठरविले होते. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर हे संमेलन बेळगावातच घेण्याचे एकमताने ठरले. या सर्व पाश्र्वभूमीवर होत असलेल्या या नाटय़संमेलनात बेळगावकर मराठी भाषकांचा सीमाप्रश्नावर ठराव संमत करवून घेण्यासाठी दबाव वाढत आहे. त्यावरून नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांतही अस्वस्थता आहेच. या संदर्भात काल काही मराठी तरुणांनी मोहन जोशी यांना पुनश्च धारेवर धरल्याचे कळते. दरम्यान, येथील पोलीस प्रशासनाने या नाटय़ संमेलनास सशर्त परवानगी दिली आहे. त्यासाठी पोलिसांनी तब्बल २० अटी घातल्या आहेत.
नाटय़संमेलनात बेळगाव सीमाप्रश्न विंगेतच
येथे आज, शनिवारपासून सुरू होत असलेल्या ९५व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनात बेळगावसह मराठी भाषकबहुल प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी गेली ५० वर्षांहून अधिक काळ भिजत पडलेला सीमाप्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता धूसर दिसते आहे.
First published on: 07-02-2015 at 01:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Belgaum border dispute in shadow of marathi natya sammelan