कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे यश म्हणजे एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू अशाप्रकारचे आहे. संभाजी पाटील, अरविंद पाटील या मराठमोळ्या जोडगोळीने कर्नाटक विधानसभेवर मराठी बाण्याचा भगवा फडकविल्याने सीमाभागातील मराठी अस्मिता अजूनही चिवटपणे कार्यरत असल्याचे दिसून आले. पण याचवेळी मराठी माणसातील खेकडा प्रवृत्तीचे दर्शनही घडले. दृष्टिपथात असलेला मनोहर किणेकर यांचा विजय अन्य मराठी भाषिक उमेदवारांमुळे दुरावला गेला. हा पराभव सीमालढय़ाच्या चळवळीला अपशकुन करणारा ठरला आहे. त्यावरून आगामी काळात वादाचे पडसादही उमटत राहणार असून आरोप-प्रत्यारोपाची राळही उठत राहणार आहे.
गेल्या काही वर्षांत कर्नाटक शासनाने आपले कन्नडधार्जिण्ये धोरण बेळगाव जिल्ह्य़ात आणखीनच बळकट करण्यास सुरुवात केली होती. कन्नडिग्गांच्या अन्यायामुळे पिचलेली मराठी भाषिक जनता न्यायाच्या प्रतीक्षेत होती. बेळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मराठी भाषिकांना चांगली संधी चालून आली होती.
बेळगावातील मराठी भाषिकांनी अभेद्य एकी करून या संधीचे सोने केले. महापालिकेत ५७ पैकी ३३ नगरसेवक निवडून आणून त्यांनी महापालिकेवर भगवा झेंडा फडकविला. पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून कर्नाटक विधानसभेवर (विधानसौध) भगवा फडकविण्याची संधी चालून आली होती. याही निवडणुकीमध्ये मराठी भाषिकांचे ऐक्य कायम राहिले. मात्र निर्भळ यश मिळविण्यापर्यंत ते टिकले नाही. मुळातच सीमाभागातील उद्योजक, व्यापारी, वकील अशा सुबुध्द वर्गाने कोणत्याही परिस्थिीत विधानसभा निवडणुकीसाठी एकच उमेदवार राहिला पाहिजे, असे ठणकावून सांगितले. पाठोपाठ सीमा भागातील गटातटाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनाही नमते घ्यावे लागले.
चारवेळा महापौरपद भूषविलेले संभाजी पाटील (बेळगाव दक्षिण), अरविंद पाटील (खानापूर),माजी आमदार मनोहर किणेकर (बेळगाव ग्रामीण), माजी उपमहापौर रेणू किल्लेकर (बेळगाव उत्तर) व बाबासाहेब देसाई (निपाणी) या पाच उमेदवारांना महाराष्ट्र एकीकरण समितीने रिंगणात उतरविले होते. राज्यात सत्तेत असलेला भाजप आणि सत्तेचे वेध लागलेला काँग्रेस अशा दोन भक्कम राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांशी मराठी भाषिक उमेदवारांनी कडवा मुकाबला केला. धनशक्तीचा मुबलक वापर करणाऱ्या भाजपाचे आमदार अभय पाटील यांना चितपट करून संभाजी पाटील यांनी विजय प्राप्त केला. तर अरविंद पाटील यांनी तगडे आव्हान परतावून लावून यशाचे सोपान गाठले. आता या दोघा पाटील द्वयांनाच मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराला विधानसभेत वाचा फोडायचे काम करावे लागणार आहे.
या निवडणुकीत सर्वात खटकलेली बाब म्हणजे मनोहर किणेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ, सक्रिय मराठी भाषिक उमेदवाराचा झालेला पराभव. किणेकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय एकीकरण समिती व ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांनी घेतला होता. मात्र अन्य मराठी भाषिक उमेदवाराच्या उमेदवारीमुळेच घात झाला. शिवाजी सुंठकर या उमेदवाराने माघार घेणार असल्याचे वृत्त होते पण माशी कोठे शिंकली कळले नाही. मराठी भाषिक उमेदवारांच्या फाटाफुटीमुळे बेळगाव ग्रामीणच्या बालेकिल्ल्यात यशाने हुलकावणी दिली.
किणेकर यांच्या पराभवास नेमके कोण जबाबदार यावरून आता भवती न भवती सुरू होईल. पण हातातून सुटलेले यश पुन्हा अन् सहजासहजी मिळणे कठीण आहे. सीमा भागातील चळवळ बुलंद करायची असेल तर यापुढेही मराठी नेत्यांनी आपली मने स्वच्छ करून लढय़ात उतरणे गरजेचे आहे. अन्यथा दुसऱ्याला वर चढू न देण्याची खेकडा प्रवृत्ती कायमपणे घातच करत राहील, यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा