महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापले असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री मंगळवारी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. मात्र हा दौरा आता रद्द झाला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले,“सीमाभागातील बांधवांकडून आम्हाला आग्रह करण्यात आला होता, की ६ डिसेंबर रोजी महापरीनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादनाचा कार्यक्रम, आपल्या मराठी बांधवांनी बेळगावमध्ये आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही दोन्ही मंत्र्यांनी ३ ऐवजी ६ तारखेला यावं, त्यानुसार आम्ही आमचा ६ तारखेचा दौरा निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत असं कर्नाटक सरकारला अधिकृतरित्या कळवलेलं आहे, परंतु दौऱ्याबाबत विस्तृत माहिती दिलेली नाही. सध्या तरी हा दौरा अधिकृतरित्या रद्द केल्याचं कळवलेलं नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांशी चर्चा करून आम्ही दोघेही त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेणार आहोत.” असं शंभूराज देसाईंनी म्हटलेलं आहे.