उरण तालुक्यातील शाळकरी मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापिकेचा जामीन अर्ज अलिबागच्या सत्र न्यायालयाने फेटाळला.
  उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेतील शिक्षक दत्ता सोमनाथ जाधव आणि मुख्याध्यापिका वनिता वसंत पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, दोघांवरही उरण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ खाली मुलांचे लैंगिक शोषण अधिनियम आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम याच्या अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
   दरम्यान या प्रकरणातील आरोपी असलेल्या वनिता वसंत पाटील यांनी अलिबागच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सदर अर्जाची सुनावणी आज अतिरिक्त सत्रन्यायाधीश एच.ए. पाटील यांच्या न्यायालयात झाली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. गजानन पाटील यांनी बाजू मांडली. वनिता पाटील यांना ग्रामस्थ आणि पंचांच्या दडपणामुळे पोलिसांनी गोवल्याचा दावा करण्यात आला. मात्र शासकीय अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी हा दावा खोडून काढला. या प्रकरणातील गुन्ह्य़ाचे स्वरूप गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने सरकारी अभियोक्त्याची बाजू उचलून धरत सदर प्रकरणातील तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याने वनिता पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.