अनेक धोकादायक वळणे, घाट, खोल दऱ्या आणि पर्वतरांगांमधून जाणारा बैतुल-इटारसी रेल्वेमार्ग येत्या १३ मे रोजी शंभर वर्षे पूर्ण करणार असून रेल्वमार्गाची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने घेतला आहे. मध्य भारतातील दोन ऐतिहासिक शहरांना जोडणारा बैतुल-इटारसी हा देशातील रेल्वेमार्गापैकी सर्वाधिक अवघड रेल्वेमार्ग असून १०८ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर एकूण ९ भुयारे आणि ३०० छोटे-मोठे पूल आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत हा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला होता. शंभर वर्षांनंतरही या रेल्वेमार्गाची स्थिती अत्यंत चांगली असून यासाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्मृती जपण्यासाठी गौरवशाली वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे.
बैतुल-इटारसी सेक्शन हा नागपूर रेल्वे मंडळाच्या इतिहासातील अत्यंत आव्हानात्मक टप्पा आहे. सातपुडा पर्वतराजींमध्ये बांधण्यात आलेल्या या रेल्वेमार्गाची उभारणी शंभर वर्षांपूर्वी अत्यंत क्लिष्ट आणि जिकिरीचे काम होते. रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू असताना अनेकांना प्राणाचे बलिदान द्यावे लागले. चढउतारांचे अवघड टप्पे असलेल्या पर्वतराजींमधून ही रेल्वेलाइन टाकण्यात आली आहे. त्या वेळी बांधकामशास्त्र आजच्या एवढे प्रगत नव्हते आणि अवघड जागी पोहोचण्यासाठी पुरेशी साधने तसेच बांधकाम साहित्यदेखील उपलब्ध नव्हते. तरीही रेल्वे खात्याने पूर्व भारत, पश्चिम भारत, दक्षिण भारत तसेच उत्तर भारताला रेल्वेमार्गाद्वारे जोडण्याचे आव्हान स्वीकारले. यानंतर १३ मे १९१३ या दिवशी या रेल्वेमार्गावरून वाफेचे इंजिन लावलेली पहिली रेल्वे धावली.
सातपुडा पर्वतांमधील खोल दऱ्या, मोठे पर्वत फोडून रेल्वेमार्गाची बांधणी करण्यात आली आहे. या मार्गावरून रेल्वेगाडीतून जाताना दऱ्या-खोऱ्यांमधील प्रवासाचा खरा आनंद लुटता येतो. परंतु, यामागे हजारो लोकांनी अत्यंत कष्ट घेतले आहेत, काहींची जीवसुद्धा गेला आहे. या रेल्वेमार्गाच्या उभारणीचा निर्णय ब्रिटिशांच्या काळात घेण्यात आला होता. हे आव्हान अवघड होते कारण, या दूरवर पसरलेल्या दऱ्या आणि पर्वतरांगांमधून रेल्वेरुळासाठी जागेची निवड करणे, खोदकाम करणे आणि रेल्वेरुळांची मजबुती या महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेऊन त्याची बांधणी करायची होती. सर्वात मोठे आव्हान रेल्वे रूळ बांधकामासाठीचे साहित्य एवढय़ा उंचीवर नेणे हेच होते. त्यासाठी मनुष्यबळदेखील मोठय़ा प्रमाणात लागणार होते. मजुरांनाही या पर्वतीय प्रदेशात काम करण्यासाठी राजी करण्याची कसरत तत्कालीन सरकारला करावी लागली होती. भारतीय रेल्वे आणि मध्य रेल्वेची सुरुवात द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीच्या माध्यमातून झाली. आजपासून १६० वर्षांपूर्वी १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य भारतातील उपमहाद्वीपावर मुंबई ते ठाणे या रेल्वेमार्गावरून पहिली रेल्वेगाडी धावली आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सोनेरी क्षण नोंदला गेला. हा रेल्वेमार्ग फक्त ३३ किलोमीटरचा होता. त्यानंतर भारतीय रेल्वेने मागे वळून पाहिले नाही. आजमितीस भारतीय रेल्वेचे संपूर्ण देशभर पसरलेले ३९०५ रुट किलोमीटरचे अफाट असे रेल्वेमार्गाचे स्वतंत्र जाळे असून अनेक चढ-उतारांच्या मार्गावरून सेवा देणारी जगातील अत्यंत सक्षम रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. द ग्रेट इंडियन पेनिनसुला कंपनीने रेल्वेरुळांच्या जाळ्याचा विस्तार करून देशाचे हृदयस्थान असलेल्या नागपूर शहराला २० फेब्रुवारी १८६७ या दिवशी पहिली रेल्वेसेवा दिली. त्यानंतर १८७० साली मुंबई ते इटारसीपर्यंत भुसावळ-खंडवा मार्गे रेल्वेसेवा विस्तारली. पूर्व भारत आणि पश्चिम भारताला जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचे काम अत्यंत झपाटय़ाने करण्यात आली. परंतु, उत्तर भारत आणि दक्षिण भारत रेल्वेमार्गाने जोडण्याच्या कामासाठी बराच कालावधी जाऊ द्यावा लागला. याच अवघड कामांपैकी सातपुडा पर्वतरांगामधून जाणाऱ्या बैतुल-इटारसी रेल्वेमार्गाचे अवघड आव्हान रेल्वे कंपनीने स्वीकारले होते. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर वाफेचे इंजिन लावलेल्या रेल्वेगाडीला या मार्गावरून ३ तासांचा वेळ लागत असे. आता मेलची सुविधा झाल्याने हे अंतर अवघ्या १ तास ४५ मिनिटांत पूर्ण करता येते. ग्रँड ट्रंक आणि दक्षिण एक्स्प्रेस या मार्गावरून धावणाऱ्या सर्वात जुन्या रेल्वेगाडय़ा असून त्यांची अविरत सेवा १०० वर्षांपासून अव्याहत सुरू आहे. या रेल्वेमार्गाचे वैशिष्टय़ म्हणजे वाफेचे इंजिन बंद झाल्यानंतर १९७० पर्यंत येथून डिझेलचे इंजिन लावून प्रवाशांना सेवा देण्यात येत आली. त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी या मार्गावरून विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले.