राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. यावर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी “हा महाराष्ट्राचा विजय असल्याचं म्हटलं आहे.” आदित्य यांनी ट्विटरवरन त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे की, “महाराष्ट्राचा मोठा विजय! महाराष्ट्रविरोधी राज्यपालांचा राजीनामा अखेर स्वीकारला! छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपली राज्यघटना, विधानसभा आणि लोकशाहीतले आदर्श यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून स्वीकारता येणार नाही!”
दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला आहे.” माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला, ते अतिशय दुर्देवी असून हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झाले नव्हतं. कोश्यारी यांनी मोठं पाप केलं आहे. नव्या राज्यपालांच्या नियुक्तीनंतर उशीरा का होईना महाराष्ट्राला न्याय मिळाला”
हे ही वाचा >> “महाराष्ट्रातली घाण…” राज्यपालांच्या राजीनामा मंजुरीनंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्रातली घाण गेली : दानवे
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. दानवे म्हणाले की, “राज्यपालांनी सातत्याने मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा आणि इथल्या महापुरुषांचा अपमान केला, महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीच त्यांना केंद्र सरकारने पाठवलं असावं. परंतु सरकारने आता त्यात दुरुस्ती केली आहे. यावर महाराष्ट्रातली घाण गेली असंच मी म्हणेन.”