महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (२९ जुलै) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी भगतसिंह कोश्यारी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”

जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

“गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे”

हेही वाचा : “स्वातंत्र्यापासून महाराष्ट्राला लाभलेल्या राज्यपालांपैकी हा एक नंबरचा बोगस राज्यपाल”; कोश्यारींना अपक्ष आमदाराने केलं लक्ष्य

सचिन सावंत म्हणाले, “राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagat singh koshyari controversial comment on financial capital of india mumbai maharashtra pbs