राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केली. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाला घेरलं. यानंतर आता स्वतः भगतसिंह कोश्यारी यांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता”

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. शुक्रवारी (२९ जुलै) राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.”

“मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले”

“मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही,” असं स्पष्टीकरण भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

“एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो”

भगतसिंह कोश्यारी पुढे म्हणाले, “नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये.”

हेही वाचा : VIDEO : गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही – भगतसिंह कोश्यारी

“किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही”

“किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhagat singh koshyari first comment after row on controversial statement about mumbai pbs