महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या जागांसाठी नावं पाठवली होती. मात्र, पदावरून पायउतार होईपर्यंत भगतसिंह कोश्यारी यांनी या १२ आमदारांबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी अनेकदा कोश्यारींवर टीकास्र डागलं होतं. यावर आता भगतसिंह कोश्यारींनी स्पष्टीकरण दिलं आहे. भगतसिंह कोश्यारींनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे.
१२ आमदारांबाबत शेवटपर्यंत निर्णय घेतला नाही? असं भगतसिंह कोश्यारींना विचारण्यात आलं. त्यावर कोश्यारींनी सांगितलं की, “महाविकास आघाडीची शिष्टमंडळ येत राहिली. त्यांना सांगितलं, हे पाच पानांचं पत्र पहा. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पाच पानांच्या पत्रात तुम्ही राज्यपालांना धमकी देत, कायदे सांगत आहात. शेवटी लिहतात १५ दिवसांत मंजूर करा.”
हेही वाचा : शिंदे गट व्हीप बजावण्याच्या तयारीत, ठाकरे गटातील आमदार अपात्र होणार? उद्धव ठाकरे म्हणाले…
“कुठं लिहलं आहे, की मुख्यमंत्री राज्यपालांना सांगतात, एवढ्या दिवसांत मंजूर करा. संविधान, विधानसभेत असं कुठं लिहलं आहे. कधीतरी ते पत्र समोर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल. पण, दुसऱ्याच दिवशी मी सही करणार होतो,” असं भगतसिंह कोश्यारींनी स्पष्ट केलं आहे.
“माझे संबंध चांगले होते. मात्र, त्यांचे ( उद्धव ठाकरे ) सल्लागार कोण होतं? त्यांचे आमदार येऊन सांगत होतो की, आम्हाला वाचवा. उद्धव ठाकरे शकुनीमामाच्या जाळ्यात अडकले होते. माहिती नाही कोण होता, तो शकुनीमामा,” अशी टीप्पणी कोश्यारींनी केली आहे.
हेही वाचा : “पिसाळलेल्या कुत्र्याला औषध देऊन…”, शिंदे गटाच्या आमदाराची संजय राऊतांवर घणाघाती टीका
“उद्धव ठाकरे संत माणूस आहेत. बिचारे कुठं राजकारणात पडले. माणूस जर सरळमार्गी, सज्जन नसता, राजकारणी असता, शरद पवारांसारख्या राजकारणातील ट्रिक माहिती असत्या, तर असं लिहलं असतं का? चार ओळीत लिहून पाठवलं असतं. तर, सही करणं मला भाग पडलं असतं,” असं भगतसिंह कोश्यारांनी म्हटलं आहे.