पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके मंगळवारी ( २७ जून ) भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल. भगिरथ भालके यांचा हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे. या पक्षप्रवेशावर भगिरथ भालके यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
भगिरथ भालके म्हणाले, “भारत भालके यांनी जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. त्यांच्या निधनानंतर विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. पण, यात माझा पराभव झाला. या पराभवानंतर पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींनी कुटुंब आणि मतदारसंघावर लक्ष द्यायला हवं होतं. मात्र, नेहमीच पक्षाकडून दुय्यम वागणूक देण्यात आली.”
“गेल्या महिन्यात पक्षप्रमुख शरद पवार आणि निरीक्षकांच्या उपस्थितीत पंढरपुरात पक्षसोहळा पार पडला. तेव्हा निरीक्षकांचं बोलणं भारत भालके यांच्याबरोबर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वेदना देणारं होतं. भारत भालके निधनानंतर पक्षाने आमच्या पाठिशी उभे राहायला पाहिजे होतं. तसे, न करता आमच्यावर टीका करण्यात आली,” असा आरोप भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादीवर केला आहे.
हेही वाचा : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपाने व्हिडीओ शेअर करत सांगितली ‘ही’ कारणं
“विठ्ठल सहकारी कारखान्याला मदत करावी म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना भेटलो. मात्र, मला मदत करायचं सोडून एमएससी बँकेचे प्रमुख आमचं ऐकत नाहीत, असं सांगण्यात आलं. ही गोष्ट न पटण्यासारखी होती. मतदारसंघातील विविध कामासांठी पक्षातील वरिष्ठांना भेटलो. पण, भेटीनंतर आमच्यावर जो विश्वास दाखवायला पाहिजे होता, तो दिसून आला नाही. पक्षात दुजाभावाची वागणूक मिळाल्यानंतर आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे,” असं भगिरथ भालके यांनी स्पष्ट केलं.