सांगली : तुरची येथील भाग्योदय शेतकरी गटाने एकरी ६३ क्विंटल मका उत्पादन घेत पाणी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या गटाचा पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

पाणी फाउंडेशनच्यावतीने राज्यभरात शेतकरी गटासाठी फार्मर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ४ हजार ५०० शेतकरी गटांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत तुरची (ता. तासगाव) येथील भाग्योदय शेतकरी गटाने प्रथम क्रमांक पटकावला. या गटाला बालेवाडी येथे एका कार्यक्रमात बक्षीस देण्यात आले. यावेळी अभिनेता अमिर खान, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, किरण राव, ओंकार सुर्वे, प्रशांत गवंडी, अवधूत गुरव, नम्रता खानापुरे, प्रशांत गोडबोले आदी उपस्थित होते.

अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन मार्फत वॉटर कप स्पर्धा उभारून राज्यभरात पाण्याची मोठी चळवळ उभी केली. राज्यातील पाणी फाउंडेशनचे समन्वयक बांधावर जाऊन प्रशिक्षण देत नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देत होते. एकत्रित गट शेती करावी, हा त्यांचा मुख्य उद्देश होता. तसेच या माध्यमातून शेतकरी एकत्र येणे, बाजारपेठ, तंत्रशुद्ध माहिती यांसह अनेक गोष्टी करण्यात आल्या.

तासगाव तालुक्यातील तुरची येथील भाग्योदय शेतकरी गटाने एकरी ६३ क्विंटल मक्याचे उत्पादन घेत राज्यस्तरीय पहिला क्रमांक पटकावला.
पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमात भाग्योदय शेतकरी गटाला राज्यस्तरीय फार्मर कपचा विजेता घोषित करण्यात आले. पाणी फाउंडेशनकडून २५ लाख बक्षीस देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच लाख तर कृषीमंत्री कोकाटे यांनी ड्रोन बक्षीस जाहीर केले.

तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये स्वामी समर्थ शेतकरी गट, खुजगाव या शेतकरी गटाने प्रथम क्रमांक तर कृषी महिला शेतकरी गट चिखलगोठण व शिवशंभो शेतकरी गट, ढवळी यांना उत्तेजनार्थ घोषित करण्यात आले. सावर्डे येथील महिलांच्या कृषी माता शेतकरी गटाने राज्यात अंतिम २५ शेतकरी गटात येण्याचा मान मिळवला. त्यांना पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.