ढालेगाव बंधाऱ्यावरील गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज पूर्ववत चालू करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ढालेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या ३०-३५ कार्यकर्त्यांना अटक केली. 

पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे गोदावरी नदीवर उच्च पातळी बंधारा बांधण्यात आला. अत्यल्प पाऊस झाला असतानाही हा बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. बंधाऱ्यावर गोदाकाठच्या गावांतील शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहे. ढालेगाव, रामपुरी, निवळी, पाटोदा, मरडसगाव, गोपेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी या बंधाऱ्यावर सिंचनासाठी वीजमोटारी टाकल्या आहेत. या बंधाऱ्यावरच शेतीचे सिंचन अवलंबून आहे. पाथरी शहरासाठी ढालेगाव बंधाऱ्यातील पाणी आरक्षित करावे, अशी मागणी पालिका मुख्याधिकाऱ्यांनी केली. यामुळेच शेतकऱ्याच्या कृषिपंपाची वीज तोडण्यात आली. वीजतोडणी मोहीम पोलीस बंदोबस्तात राबविली. कृषिपंपाची वीज तोडल्याने गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांवर संक्रांत आली. कृषिपंपाचे वीज पुन्हा जोडावी, या मागणीसाठी कॉ. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ढालेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसविले व पाथरी येथे आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
आंदोलनात सखाराम मगर, अमृत गिराम, उत्तमराव िशदे, श्रीकांत मुळीत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजयकुमार सीताफळे आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

Story img Loader