१९२१-२०१५
ज्येष्ठ रंगकर्मी, संगीत रंगभूमीवरील अभिनेते, गायक, दिग्दर्शक नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र गायक-अभिनेता ज्ञानेश पेंढारकर, सून गायिका नीलाक्षी पेंढारकर, तसेच आणखी एक पुत्र व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवारी पेंढारकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. पेंढारकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी शीव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
नाटय़वर्तुळात ‘अण्णा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही नाटके विशेष गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’मधील पेंढारकर यांनी साकारलेली ‘दिगू’ ही व्यक्तिरेखा अजरामर झाली. याच नाटकातील ‘आई तुझी आठवण येते’ हे गाणेही खूप गाजले. पेंढारकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आदी अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि दिलेल्या वेळेतच नाटय़प्रयोग सुरू करणारे निर्माते म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबई मराठी साहित्य संघात सादर झालेल्या ३००नाटकांचे ध्वनिमुद्रण पेंढारकर यांनी केले होते. रंगभूमीच्या इतिहासात दस्तावेजीकरण ठरेल असे महत्त्वाचे काम त्यांनी यानिमित्ताने केले.
नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांचे निधन
ज्येष्ठ रंगकर्मी, संगीत रंगभूमीवरील अभिनेते, गायक, दिग्दर्शक नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-08-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhalchandra pendharkar passed away in mumbai