दरवर्षी पुराचा फटका; पर्लकोटा नदीवरील पुलाचा प्रस्ताव १७ वर्षांपासून धुळखात

महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवर असलेला, इंद्रावती, पामुल गौतम व पर्लकोटा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेला आणि राज्यपालांनी दत्तक घेतलेला भामरागड हा नक्षलग्रस्त तालुका दरवर्षी पावसाळय़ात पुराने चारही बाजूंनी वेढलेला असतो. गेल्या बुधवारी आलेल्या पुरातही भामरागड व लगतची शंभर गावे पुराच्या पाण्याने वेढली होती. पर्लकोटा नदीवरील उंच पुलाचा प्रस्ताव १७ वर्षांपासून धुळखात पडला असल्यामुळे भामरागडवासीयांना दरवर्षी पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

गडचिरोली जिल्हय़ातील भामरागड हा तालुका समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पामुळे जगाच्या नकाशावर आलेला आहे. सर्वाधिक नक्षलग्रस्त तालुका अशी भामरागडची ओळख असली तरी डॉ. आमटे यांच्या सामाजिक कार्याने ती कधीच पुसली गेली आहे. आज या तालुक्याला देशविदेशातील हजारो पर्यटक भेटी देतात. घनदाट जंगल आणि त्यातून खळखळ वाहणाऱ्या इंद्रावती, पामुल गौतम व पर्लकोटा या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या आदिवासी तालुक्याला तत्कालीन राज्यपाल अलेक्झांडर यांनी दत्तक घेतले होते. भामरागडचे बकालपण आता दूर होईल, असा विश्वास तेव्हा दाखविण्यात आला होता. मात्र, आज इतकी वर्षे झाली तरी तालुका आहे त्याच स्थितीत आहे. विकासाच्या नावावर येथे म्हणावी तशी कामे तर सोडाच भामरागडमध्ये प्रवेश करणारा पर्लकोटा नदीवरील पूल लालफितशाहीत अडकल्यामुळे दरवर्षी या तालुक्याला पुराचा सामना करावा लागतो आहे. प्रसंगी पावसाळय़ात भामरागड व परिसरातील जवळपास दोनशे गावांचा एकप्रकारे महाराष्ट्राशी संपर्क तुटलेला असतो. हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पापासून तर भामरागड परिसरात सर्वत्र पाणीच पाणी असते. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी दरवर्षी येथे बोटी उतरवाव्या लागतात. गेल्या कित्येक वर्षांपासून हे असेच सुरू आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ पावसाळय़ापूर्वीच तीन महिन्यांचे राशन घरात भरून ठेवतात. कधी पूर येईल आणि संपर्क तुटेल ही भीती लोकांमध्ये दरवर्षी पावसाळय़ात असते. यंदाही मुसळधार पावसामुळे बुधवारी तीच स्थिती उद्भवली होती. भामरागड गावात तसेच लगतच्या शंभर गावांत पुराचे पाणी शिरले होते. वीज पुरवठा खंडित झाला आणि मोबाईल व संपर्काचे सर्व रस्ते बंद झाले होते. केवळ पर्लकोटा नदीवर उंच पूल होत नसल्यामुळे या भागातील दोनशे गावांतील लोकांना दरवर्षी पुराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. २००० साली भामरागड येथे पूर आला असता तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी भामरागडला भेट दिली होती. त्याच वेळी मुख्यमंत्री देशमुख यांनी पर्लकोटा नदीवर उंच पूल बांधण्याची घोषणा केली होती. आज या गोष्टीला १७ वर्षेपूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही हा पूल झालेला नाही. आलापल्ली ते भामरागड या दोन गावांच्या मध्ये पर्लकोटा व बांडीया या दोन नद्या तथा पेरीमिली, ताडगाव, कुडसेरी, आलापल्ली व पिंपळखेर असे एकूण पाच नाले आहेत. या सर्वाचे पाणी पर्लकोटा नदीत येऊन विसावते. त्यामुळे पर्लकोटा नदीचे पात्र लवकरच भरते. तसेच छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस झाला तरी पर्लकोटा नदीचे पात्र दुथडी भरून वाहते. त्यामुळे पर्लकोटाला पूर येतो आणि भामरागड गावात पाणी शिरते.

आलापल्ली-भामरागड या मार्गावरील पाच नाले व दोन नद्यांवर पूल बांधल्यानंतरच ही समस्या सुटणार आहे. सध्या तरी पूल बांधकामाचा तसा कुठलाही प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही अशी माहिती आहे. पर्लकोटा नदीवर ५५ कोटींचा उंच पुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंतु आता आलापल्ली ते भामरागडपर्यंतचा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्याने आणि हा पूलही त्याच महामार्गातर्गत येत असल्यामुळे या पुलाचे दुखणे आणखीच कठीण झाले आहे. पर्लकोटा नदीवरील पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तरी भामरागड तालुक्याची पुरापासून सुटका नाही असेच काहीचे चित्र येथे दिसत आहे.

पर्लकोटा नदीवर जोपर्यंत मोठय़ा उंच पुलाची निर्मिती होत नाही तोपर्यंत ही समस्या सुटणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी या नदीवर पुलाची घोषणा केली. मात्र. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर राज्य शासनाने जणू याकडे लक्ष देणेच सोडून दिले आहे. पुरामुळे या भागातील रस्ते, डांबरी रस्ते दरवर्षी वाहून जातात. दोन नद्या व पाच पुलामुळे भामरागडचा जगाशी संपर्क तुटतो. आलापल्ली ते भामरागड या रस्त्यावर प्रत्येक नाला व नदीवर पाणी असते. भामरागड तालुक्याची दरवर्षीची ही समस्या लक्षात घेऊन निदान आतातरी राज्य शासनाने या पुलाचे काम गांभीर्याने घ्यावे.

– अनिकेत आमटे, लोकबिरादरी प्रकल्प, भामरागड.

पूर ही भामरागडची दरवर्षीची समस्या झाली असल्याने पर्लकोटा नदीवर उंच पूल व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या तालुक्याकडेच राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळय़ात किमान चार ते पाच वेळा हा रस्ता बंद होतो. ही समस्या फार जुनी आहे. तेव्हा आधीच्या आणि आताच्या लोकप्रतिनिधींनी याकडे जातीने लक्ष देणे आवश्यक होते. परंतु त्यांनीही या समस्येकडे लक्ष दिले नाही. आज अख्या तालुकावासीयांना पुराचा सामना करावा लागतो आहे. ही फार वाईट गोष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात पुलासाठी लढा देणार आहे.

– अ‍ॅड. लालसू नोगोटी, जिल्हा परिषद सदस्य, गडचिरोली.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्लकोटा नदीवर ५५ कोटींच्या पूल बांधकामाचा प्रस्ताव पाठविलेला आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात आष्टी-आलापल्ली-भामरागड हा संपूर्ण रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. त्यामुळे आता हा पूल राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झालेला आहे. हा पूल आता केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. असे असले तरी जिल्हाधिकारी नायक यांनी एप्रिल महिन्यात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला असून या पुलाचे काम विविध विकास योजनांतर्गत येणाऱ्या निधीतून तात्काळ करावे अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्रालयाला सुध्दा जिल्हाधिकरी नायक यांनी पत्र लिहिले आहे. कोणत्याही स्थितीत हा पूल करायचाच, असा निर्धार केलेला आहे.

– प्रदीप खेवले, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोली.

Story img Loader