Congress MP Prashant Padole : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर सत्ताधाऱ्यांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी काय घडलं?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खासदार प्रशांत पडोळे हे एका गाडीमधून प्रवास करताना दिसत आहेत. असंही सांगितलं जात आहे की, ते शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. मात्र, यावेळी एका रस्त्यावरून जात असताना खासदार प्रशांत पडोळे यांनी त्यांच्या गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केला असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा : Kirit Somaiya Letter: किरीट सोमय्या म्हणाले, “त्या पत्राचा विषय आता संपला”; पक्षादेश धुडकावल्यानंतर दिलं स्पष्टीकरण!

प्रशांत पडोळे हे प्रवास करत असलेल्या मार्गावरील रस्त्यावर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आहे. रस्त्यावर पाणी साचलेलं पाहून प्रशांत पडोळे यांची गाडी थांबताना दिसत आहे. त्यानंतर खासदार प्रशांत पडोळे हे गाडीच्या बोनेटवर बसलेले पाहायला मिळतात. एवढंच नाही तर रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून त्यांची गाडी जात असताना ते बोनेटवर बसलेले पाहायला मिळतात. गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केलेला व्हिडीओ त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काढल्याचंही दिसून येत आहे.

दरम्यान, खासदार प्रशांत पडोळे यांचा गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केलेला व्हिडीओ व्हायरल (video viral) झाल्यानंतर आता सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांसह अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच एकीकडे शेतकरी पुरस्थितीमुळे हैराण झाला आहे. मात्र, दुसरीकडे खासदार अशा प्रकारे स्टंटबाजी करत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. असं असलं तरी अद्याप खासदार प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांची याबाबत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

प्रशांत पडोळे कोण आहेत?

प्रशांत पडोळे हे काँग्रेस (Congress) पक्षाचे भंडाऱ्याचे खासदार आहेत. राजकारणात आधी ते सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचं सांगितलं जातं. त्यांनी २००५ साली सक्रिय राजकारणात प्रवेश केला. काही दिवस त्यांनी भंडारा (Bhandara) जिल्ह्यात दुध संघाचं संचालक म्हणूनही काम केलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी साकोलीमधून निवडणूक होती. त्यानंतर या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा (BJP) पराभव करत विजय मिळवला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandara congress mp prashant padole journey sitting on the bonnet of the car video viral gkt