भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत पटेलांची ढिलाई; ना व्यूहरचना, ना मोर्चेबांधणी, कार्यकर्तेही शांतच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून नाना पटोले यांनी खासदारकी सोडल्याने भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असून ती जिंकण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुरुवातीपासून या निवडणुकीत मवाळ भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस येथे ‘अप्रफुल्लित’ वातावरणात निवडणूक लढवत असल्याचे जाणवत आहे. या क्षेत्रातील मतदार प्रफुल्ल पटेल यांना ‘भाई’ संबोधतात. ‘भाई’ जेव्हा निवडणूक लढतात तेव्हा पक्षाचा एक वेगळाच माहोल मतदारसंघात जाणवत असतो, परंतु या निवडणुकीत तसा माहोल अद्याप निर्माण झालेला नाही.
‘भाई’च्या विजयासाठी प्रत्येक तालुक्यात पटेल यांचे खंदे समर्थक निवडणूक काळात सक्रिय झालेले असतात, परंतु या निवडणुकीत मात्र आधीपासूनच पटेल यांनी ढिलाई दाखवल्याचे त्यांचेच कार्यकर्ते सांगत आहेत.
विदर्भातील कडक उन्हाळ्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ात होत आहेत, परंतु जिल्हा मुख्यालय आणि तालुक्याच्या ठिकाणी वगळता निवडणुकीचा रंग चढलेला नाही. ही निवडणूक लादण्यात आली, असा प्रचार भाजप करीत आहे. राष्ट्रवादीने गेल्या चार वर्षांत मोदी सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा उचलला आहे. महागाईचा मुद्दाही गरम आहे. भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर, मोहाडी, लाखनी तालुक्यांतील मतदारांशी प्रस्तुत प्रतिनिधीने चर्चा केली असता पक्षापेक्षा उमेदवाराकडे बघून मतदान होण्याची चिन्हे दिसत आहेत. मोहाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत येरपुडे यांनी जिल्ह्य़ातील निवडणुकांचा इतिहास बघता, उमेदवाराकडे बघून मतदान केले जाते, असे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुमसरच्या प्रचारसभेत पालघर आणि भंडारा लोकसभा पोटनिडणुकीची तुलना केली. वागना यांच्या निधनामुळे पालघर येथे निवडणूक होत आहे, भंडारा येथे कोणाचे निधन झाले, असा सवाल केला. मुख्यमंत्र्यांच्या या प्रश्नामुळे कुणबी समाजातील एक वर्ग नाराज असून त्यांचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. मात्र, मोहाडी नगर पंचायतच्या अपक्ष नगरसेविका सायत्रा पारधी यांच्या मते, उज्ज्वलासारख्या योजनांचा लाभ भाजपला मिळण्याची शक्यता आहे.
गोपालदास अग्रवालांच्या भूमिकेकडे लक्ष
काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी स्वत:हून दोन-तीन सभा घेतल्या आहेत. तसेच ते नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर सभेत सहभागी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले नाना पटोले यांची छुपी मदत अग्रवाल यांनी केल्याची चर्चा सर्वत्र होती. शिवाय अग्रवाल यांनी गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायतीमध्ये भाजपशी आघाडी करून राष्ट्रवादीला दूर ठेवले आहे. अग्रवाल यांचा गोंदिया शहर आणि ग्रामीणमध्ये प्रभाव आहे. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रचारात ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या बाजूने दिसत असले तरी शेवटच्या क्षणी ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
अजबलाल शास्त्रींना भाजपची रसद?
२००४ मध्ये अजबलाल शास्त्री यांनी बसपाकडून निवडणूक लढवत सुमारे ९५ हजार मते घेतली होती. भाजपने शिशुपाल पटले यांना उमेदवारी दिली होती. दलित मतांचे विभाजन झाल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा निसटता पराभव झाला होता. आता शास्त्री यांची बसपातून हकालपट्टी झाली आहे. हेच शास्त्री आता अपक्ष लढत आहेत. त्यांच्या प्रचारातील वाहने आणि कार्यकर्ते बघता त्यांना भाजपची रसद मिळाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय भारिप बहुजन महासंघाचे लटारू मडावी हेदेखील रिंगणात आहेत. भंडारा जिल्ह्य़ात प्रत्येक गावात मडावी यांची प्रचार वाहने दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्यासाठी दोन्ही उमेदवार किती मते मिळवतात यावर बरेच काही अवलंबून आहे. भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार सभा सुरू आहेत. या सभेची सुरुवात भाजपचा त्याग करणारे माजी खासदार नाना पटोले यांचा खासदारकीच्या राजीनाम्याने होते. नाना पटोले यांनी पोटनिवडणूक लादली अशी सुरुवात करून पटोले यांच्यावर वैयक्तिक हल्लाबोल हे या नेत्यांचे प्रमुख अस्त्र असते.
बेरजेचे राजकारण
भाजपने भंडारा जिल्ह्य़ाचे शिवसेनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले आणि गोंदिया जिल्ह्य़ातील माजी आमदार रमेश कुथे यांचा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश घडवून आणला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या परंपरागत दलित, आदिवासी मतांचे विभाजन करणे आणि कुणबी, ओबीसी मतांच्या बेरजेचे राजकारण भाजप करीत आहे.
पटोले-पटेल संयुक्त सभा नाही
भंडारा जिल्ह्य़ातील साकोली, लाखांदूर, लाखनी आणि पवनी तालुक्यांच्या काही भागात नाना पटोले यांच्या प्रभाव आहे. निवडणुकीपूर्वी नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांनी संयुक्त प्रचार सभा घेण्याची घोषणा केली होती, परंतु निवडणुकीला जेमतेम चार दिवस उरले तरी या नेत्यांनी भंडारा जिल्ह्य़ात एका व्यासपीठावर येण्याचे टाळले आहे.