भंडारा जिल्ह्य़ातील लाखणी तालुक्यातील मुरमाडी गावातील एकाच घरातील तीन मुलींवर झालेल्या बलात्कार व हत्याप्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागाकडून तपास करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी राज्यसभेत केली. भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी भंडारा बलात्कार प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटना सातत्याने वाढताहेत, याकडे त्यांनी आपल्या भाषणात लक्ष वेधले.
कॉंग्रेसचे राज्यसभेतील सदस्य हुसेन दलवाई यांनीही भंडारा बलात्कार प्रकरणातील दिरंगाईबद्दल सरकारवर टीका केली. बलात्कार प्रकरणातील दोषींना शोधण्यात एवढी दिरंगाई का, असा सवाल त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला.
या घटनेनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकास निलंबित केले आहे. केंद्र सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना भंडारा घटनेचा अहवाल पाठविण्यास सांगितले होते.

Story img Loader