अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील सहय़ाद्रीच्या डोंगररांगांत मंगळवारी सर्वदूर धुवाधार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे मुळा व भंडारदरा धरणात २४ तासांतच अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणाचा पाणीसाठाही जवळपास पाऊण टीएमसीने वाढला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे ७ इंच (१७५ मिलिमीटर) तर कळसूबाईच्या शिखराजवळील वाकी येथे ६ इंच (१५० इंच) पाऊस पडला. १ हजार ६० दक्षलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा धरणाचा पाणीसाठा २४ तासांतच १४ टक्क्यांनी वाढला.
गेल्या आठवडाभरापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमीअधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मागील तीन दिवस मुसळधार पावसाची संततधार सुरू असून काल वादळी वाऱ्यासह पश्चिम भागात पावसाने झोडपून काढले. सततचा पाऊस, जोरदार वारे, जलमय झालेली भातखाचरे, रस्त्यावर आलेले ओढेनाल्यांचे पाणी आणि हवेतील बोचरा गारठा यामुळे पश्चिम भाग गारठून गेला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातही मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात ५३७ दक्षलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. बुधवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७ हजार २५१ दक्षलक्ष घनफूट झाला होता. याच काळात निळवंडे धरणात ६९९ दक्षलक्ष घनफूट नवीन पाणी आले. निळवंडेचा पाणीसाठा आज सायंकाळी ३ हजार ४४७ दक्षलक्ष घनफूट होता.
सध्या मुळा खोऱ्याच्या तुलनेत प्रवरा खोऱ्यात अधिक पाऊस पडत आहे. कळसूबाईच्या शिखरापासून रतनवाडीपर्यंत पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच घाटघरपेक्षा वाकी व पांजरे येथे अधिक पावसाची नोंद झाली. वाकीच्या पावसामुळे कृष्णवंतीला छोटासा पूर आला असून, वाकीच्या सांडव्यावरून ३ हजार ६४३ क्युसेक विसर्ग सुरू आहे. कृष्णवंतीचे पाणी तसेच भंडारदरा धरणातील वीजनिर्मितीसाठी सुरू असणारा ८४९ क्युसेक विसर्ग आणि लहानमोठय़ा ओढय़ानाल्यांचे पाणी यामुळे रंधा धबधब्याजवळ ५ हजार क्युसेक पाणी वाहात असून मंगळवारी रंधा धबधबा प्रथमच अवतीर्ण झाला.
मुळा पाणलोट क्षेत्रातील अंबीत, पाचनई, कुमशेत, जानेवाडी परिसरात ही मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कालपासून मुळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. बुधवारी सायंकाळी काळी मुळा नदीचा विसर्ग ९ हजार ५५ ऐवढा होता (१०,३४२). सकाळपर्यंतच्या २४ तासांत मुळा धरणात ४९६ दक्षलक्ष घनफूट नवीन पाणी आले. बुधवारी सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा १० हजार १८ दक्षलक्ष घनफूट झाला होता. मुळा पाणलोट क्षेत्रातील १५५ दक्षलक्ष घनफूट क्षमतेचा घोटी शिळवंडी लघुपाटबंधारे तलाव आज भरून वाहू लागला. मुळा पाणलोट क्षेत्रातील ओव्हर फ्लो झालेला हा पाचवा तलाव. अंबीत, बलठण, कोथळे व शिरपुंजे येथील तलाव यापूर्वीच भरून वाहात आहे.
भंडारदरा ७, मुळा १० टीएमसीच्या वर
अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील सहय़ाद्रीच्या डोंगररांगांत मंगळवारी सर्वदूर धुवाधार पर्जन्यवृष्टी झाली. या पावसामुळे मुळा व भंडारदरा धरणात २४ तासांतच अर्धा टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली.
First published on: 30-07-2015 at 03:15 IST
TOPICSमुळा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhandarda 7 mula more than 10 tmc