तीन दिवसांच्या मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा बहर आता ओसरला आहे. या तीन दिवसांत भंडारदरा धरणात सुमारे तीन टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली, त्यामुळे धरण ६१ टक्केभरले आहे. मुळा धरणाचा पाणीसाठाही अकरा टीएमसीपेक्षा जास्त झाला असून, आजपासून देवठाण येथील आढळा धरणात नव्याने पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. या धुवाधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी जनजीवन विस्कळीत झाले असून, आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सोमवारी सायंकाळपासून कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांत धुवाधार पर्जन्यवृष्टी सुरू होती. या काळात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वच ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठय़ातही मोठी वाढ झाली. भंडारदरा धरणात गुरुवारी सायंकाळी ६ हजार ७८४ दशलक्ष घनफूट पाणी होते. दुपारी एकपासून भंडारदरा जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीस सुरुवात करण्यात आली. वीजनिर्मितीसाठी धरणातून सध्या ८४९ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत आज पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला. पाणलोट क्षेत्रातील पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे. घाटघर १३०, रतनवाडी १९९, पांजरे १२५, वाकी १००. पाणलोट क्षेत्राबाहेर निळवंडे ६५, अकोले ४१ व कोतूळ ३४ या ठिकाणीही चांगला पाऊस पडला.
वाकीच्या तलावावरून अद्यापही १ हजार क्युसेकपेक्षा जास्त विसर्ग सुरू आहे. भंडारदरा ते रंधा धबधबापर्यंतच्या क्षेत्रात नदीला दोन्ही बाजूंनी येऊन मिळणारे ओढेनाले अद्यापही जोमदारपणे वाहत आहेत. त्यामुळे ३४ मेगावॉट क्षमतेच्या कोदणी जलविद्युत प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. वीजनिर्मितीनंतर हे पाणी निळवंडेत जमा होते. निळवंडेच्या पाणीसाठय़ातही तीन दिवसांत चांगलीच वाढ झाली व पाणीसाठा दोन टीएमसीपेक्षा जास्त झाला. सायंकाळी निळवंडे धरणात २ हजार १७६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता.
मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजा पर्वत, हरिश्चंद्रगड परिसरात बुधवारी विक्रमी पाऊस पडला, त्यामुळे काल दुपारी मुळा नदीला मोठा पूर आला होता. चोवीस तासांत मुळा धरणात त्यामुळे जवळपास दोन टीएमसी पाणी जमा झाले. गुरुवारी सकाळी मुळा धरणातील पाणीसाठा ११ हजार ६९० दशलक्ष घनफूट झाला होता. केतूळजवळ पाण्याचा विसर्गही वाढला असून, सायंकाळी १३ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. मुळा पाणलोट क्षेत्रातील अंबित, कोथळे, बलठण, देवहंडी व घोटी शिळवंडी हे पाचही लघुपाटबंधारे तलाव भरून वाहत आहेत. आढळा पाणलोट क्षेत्रातही दोन दिवस चांगला पाऊस पडला. आढळा धरणाच्या पाणीसाठय़ात गुरुवारी ४० दशलक्ष घनफुटांची भर पडली व आढळेचा साठा १८७ दशलक्ष घनफूट झाला.
नाशिक जिल्हय़ात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने गोदावरी नदीवरील धरणांमध्येही पाण्याची मोठी आवक झाली आहे. येथील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहेत. हे आकडे टक्केवारीत आहेत. दारणा- ७८, गंगापूर- ७५, कडवा- ७१, मुकणे- २४, काश्यपी- २५, वालदेवी- ५३, गौतमी- ३१ आणि भावली- ९१.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा