अकोले शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाचा परिसर लवकर कात टाकणार आहे.प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाऱ्या भंडारदरा धरण परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.धरणाच्या पायथ्याशी पर्यटन उद्यान विकसित केले जाणार असुन पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.धरण पायथ्याशी असणाऱ्या आणि एके काळी वैभवाचे दिवस अनुभवलेल्या या बागेचे नष्टचर्य अखेर संपणार असून या संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोले तालुक्यात प्रवरा नदीवर इंग्रज राजवटीत बांधलेले भंडारदरा धरण हे राज्यातील जुन्या धारणांपैकी एक होय.१९१० या धरणाच्या बांधकामास सुरवात झाली आणि १९२६ मध्ये ते बांधून पूर्ण झाले. धरणाची दगडी भिंत २७० फूट उंचीची आहे.धरणातून पाणी सोडताना निर्माण होणारा ‘अँब्रेला फॉल ‘ हा भंडारदरा चे सौन्दर्याचा मानबिंदू होय.धरणाच्या सर्वात उंच मोरीतून पाणी सोडले असताना ते खडका वरून खळाळत कोसळत असताना ते दृश्य एखाद्या भव्य छत्रीसारखे दिसते.म्हणून या धबधब्याला ‘अँब्रेला फॉल ‘म्हणतात.या अँब्रेला फॉल पुढे एक वक्राकार लोखंडी पूल आहे.

या पुलावर उभे राहून धबधब्याचे तुषार अंगावर घेत त्याचे सौन्दर्य न्याहळता येत असे.मात्र हा जुना पूल धोकादायक बनल्यामुळे तो अनेक वर्षांपासून पर्यटकांना बंद करण्यात आला आहे.धबधब्याच्या जवळही पर्यटकांना जाता येत नाही.धरण भिंतीच्या पायथ्याशी एक बाग आहे.गर्द झाडी असणारी बाग,धरणाच्या चार मोऱ्यातून सोडलेले आणि वळणावळणाच्या बांधीव पाटामधून खळाळत वहात नदीकडे जाणारे पाणी, धरणाची काळीशार उंच भिंत ,वातावरणातील सुखद गारवा या मुळे ही बाग एकेकाळी पर्यटकांचे आकर्षण होती.मात्र गेल्या काही वर्षात देखभाल दुरुस्ती अभावी या बागेची रया गेली आहे.

या बागेचे रूप आता पालटणार आहे.पर्यटकांसाठी वाहनतळ,स्वच्छता गृह,कॅफेटेरिया आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.माहिती केंद्र तसेच स्थानिक वस्तू,उत्पादन,कलाकुसर वस्तू यांच्या विक्रीसाठी दुकाने असतील.माहिती केंद्र असेल.अँब्रेला फॉल चे सौन्दर्य नीट पहाता यावे या साठी ‘व्ह्यू पॉईंट’ विकसित करण्यात येणार आहेत.पुष्प उद्यान,लता वेलींनी अच्छादलेल्या पायवाटा, टेहळणीसाठी जागा,बसण्यासाठी बाके,बैठक कट्टे आदी सुविधा असतील .बागेत एक अँफिथेटर असेल.जागोजागी माहिती फलक असतील. धरणाचे भिंतीवर जाणेसाठी दोन प्रवेशद्वारे आहेत.शंभर वर्षांपूर्वीच्या या प्रवेशद्वारांचे नुतनीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी नवीन आकर्षक भव्य प्रवेश द्वारे उभारण्यात येणार आहे.

धरण भिंतीपासून काही अंतरावर धरणाचा सांडवा आहे.या सांडव्या लगत असणाऱ्या मोठया जागेचाही विकास करण्यात येणार आहे.येथेही निरीक्षणासाठी जागा,पादचारी मार्ग,बसण्यासाठी झाडांभोवती जागा,कॅफे,भेटवस्तूचे दुकान आदी सुविधा असतील.धरण परिसरातील सर्व ‘व्ह्यू पॉईंट’ आणि अन्य घटक पुलांनी परस्परांशी जोडले जाणार आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत भंडारदरा धरण परिसराच्या ४ कोटी ९५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन अलीकडेच आमदार डॉ किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले .

सुशोभीकरणाच्या कामा नंतर धरण परिसराचे रूप पालटणार असून धरणाला भेट देणाऱ्या पर्यटकांची पावले अधिक काळ तेथे रेंगाळत रहातील हे निश्चित.तसेच स्थानिकानाही रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

भंडारदरा धरणाच्या सभोवतालचा परिसर नितांत सुंदर आणि रमणीय आहे.,धरणाचा जलाशय कळसुबाई रतनगडाच्या डोंररांगांनी वेढलेला असून अभिजात निसर्गाचे वरदान या परिसराला लाभलेले आहे.पावसाळ्यात तीन ते पाच हजार मिमी पाऊस धरण पाणलोट क्षेत्रात कोसळतो.पावसाळ्यात जलाशया सभोवालच्या डोंगर रागांतून लहान मोठे धबधबे कोसळत असतात.साम्रद जवळील सांदण दरी,घटघरचा कोकणकडा ,रतनवाडी येथिल प्राचीन शिवमंदिर अशी अनेक पर्यटन स्थळे या भागात आहेत.त्या मुळे दर वर्षी हजारो पर्यटक भंडारदरा येथे येत असतात.