विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर अधिवेशनात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामध्ये सभागृहात घडलेल्या घडामोडींसोबतच सभागृहाच्या बाहेर घडलेल्या घडामोडींची देखील जोरदार चर्चा आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर तुफान घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये ‘आदित्य ठाकरेंची दिशा चुकली’ अशी घोषणा लिहिलेले बॅनर्स देखील सत्ताधाऱ्यांनी झळकावले. त्यावरून आदित्य ठाकरेंनी देखील सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतलं असलं, तरी या घोषणेवरून तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. यासंदर्भात आता सत्ताधारी गटातील आमदार भरत गोगावले यांनी टीव्ही ९ शी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं विधानभवनाबाहेर घडलं काय?
अधिवेशनाचे सुरुवातीचे काही दिवस ५० खोकेच्या घोषणा चालल्यानंतर आज सत्ताधाऱ्यांनी थेट शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनाच लक्ष्य केलं आहे. “महाराष्ट्राचे प पू…,” ‘युवराजांची ‘दिशा’ चुकली’ अशा आशयाचे बॅनर्स गळ्यात घालून शिंदे गटाच्या आमदारांनी पायऱ्यांवर उभं राहात जोरदार घोषणाबाजी केली.
यावरून आदित्य ठाकरेंनीही शिंदे गटातील आमदारांना सुनावलं. “गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसं उभं केलंय. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागतं. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, या घोषणाबाजीवरून वेगवेगळे तर्क लावले जात असताना त्यावर भरत गोगावलेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. “दिशाचा अर्थ काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत त्यांनी आघाडी करायला नको होती. त्यांनी भाजपासोबत नैसर्गित युती करायला हवी होती. गेल्या दोन-अडीच वर्षांत तुम्ही बघितलंत, हे आम्हाला कमी कमी करत चालले होते”, असं गोगावले म्हणाले.
“दिशा पटनी वगैरे काही माहिती नाही”
दरम्यान, ‘दिशा’ या शब्दाचा संबंध दिशा पटनीशी आहे का? अशी विचारणा केली असता गोगावले म्हणाले, “दिशा पटनी वगैरे आम्हाला काही माहिती नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आम्ही काही बोलणार नाही. ते अजून तरुण रक्त आहे. लग्न झालेलं नाही. त्यामुळे त्यांना काही अधिकार आहेत. त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही”, असं भरत गोगावले म्हणाले.
“आधीच्या सत्ताधाऱ्यांचे हात कुणी धरले होते?”
दरम्यान, मुंबईतील रस्त्यांवरून देखील त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. “एका राज्याचं बजेट बनवू शकते एवढी मोठी मुंबई महानगरपालिका आहे. एवढे पैसे पडून आहेत आणि हे रोज खड्डे-खड्डे ओरडत आहेत. काल राज्य सरकारने ५ हजार कोटींच्या ऑर्डर दिल्या आहेत. वर्षभरात मुंबईतले सगळे रस्ते काँक्रिटचे केले जातील. भविष्यात कुणी बोलता कामा नये की रस्त्यांना खड्डे पडलेत. मग मुंबईकरांना काय हवंय अजून? हे निर्णय आधीचं सरकारही घेऊ शकत होतं. त्यांचे हात कुणी धरले होते?” असा सवाल भरत गोगावलेंनी उपस्थित केला आहे.