जवळपास दीड वर्षापूर्वी शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस व भाजपाच्या पाठिंब्यावर नवीन सरकार स्थापन केलं. सुरुवातीला फक्त शिंदे व फडणवीस हे दोनच मंत्री महिनाभर कारभार पाहात होते. त्यानंतर आधी पहिला व नंतर दुसरा मंत्रीमंडळ विस्तार झाला. पण अजूनही शिंदे गट, भाजपा व आता अजित पवार गटातील आमदार मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असताना भरत गोगावलेंच्या मंत्रीपदाची जोरदार चर्चा झाली. आपण मंत्रीपद का सोडलं, यासंदर्भात भरत गोगावलेंनी एका कार्यक्रमात मिश्किलपणे भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरत गोगावलेंनी राज्याच शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्यापासूनच आपल्याला मंत्रीपद मिळणार असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांना अद्याप कोणत्याही मंत्रीमंडळात मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे भरत गोगावलेंना न मिळालेल्या मंत्रीपदाची चर्चा होत असताना त्यांनी मंत्रीपद वाटणीसंदर्भात घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख एका जाहीर कार्यक्रमात केला आहे.

“एक म्हणाला बायको आत्महत्या करेल”

मंत्रीपदासाठी सरकारमधील अनेक आमदार इच्छुक असल्याचं चित्र असताना मंत्रीपदं नेमकी कुणाला वाटायची, यावर सरकारमधील वरीष्ठांच्या वारंवार बैठका झाल्याचंही दिसून आलं. मंत्रीपदासाठी काही आमदारांनी काय कारणं दिली, यावर भरत गोगावलेंनी भाष्य केलं आहे.

“नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांकडून हे शिकावं”, ठाकरे गटाचा पंतप्रधानांना खोचक टोला!

“आमचे मुख्यमंत्री अडचणीत सापडलेले दिसले आम्हाला. म्हणून मी मंत्रीपदापासून माघार घेतली. मी म्हटलं ठीक आहे. पण काय झालं? एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवतील. एक बोलतो राजीनामा देईन”, असं भरत गोगावले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

“संध्याकाळी एकाला फोन करून विचारलं काय रे, संभाजीनगरला तुम्हाला पाचपैकी दोघांना मंत्रीपदं दिली. आम्ही तीनपैकी एकही मंत्रीपद घेत नाही. आम्ही थांबतो. पण मी विचारलं तुला एवढी घाई कशाला? त्याला समजावलं. आता बायको बोलल्यावर काय करायचं? मी साहेबांना म्हटलं त्याला देऊन टाका. मग म्हटलं दुसऱ्याला नारायण राणेंनी संपवायला नाही पाहिजे. आपली एक सीट कमी होईल. म्हणून म्हटलं त्यालाही द्या. म्हटलं मी थांबतो तुमच्यासाठी. आणि मी थांबलो तो आजपर्यंत थांबलो”, असं भरत गोगावले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat gogawale eknath shinde faction on cabinet expansion pmw
Show comments