Bharat Gogawale : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेप्रकरणी सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणातील काही आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात विविध पक्षाचे नेते, आमदार आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना विविध नेत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी देखील मोठं भाष्य केलं आहे. “मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे. या घटनेत जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शासन झालंच पाहिजे, अन्यथा आमच्या सरकावर तो ठपका पडेल”, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
भरत गोगावले काय म्हणाले?
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, “बीड जिल्ह्यात जी हत्येची घटना घडली ती अंत्यत दुर्देवी आहे. ही हत्या अत्यंत निर्घृण पद्धतीने करण्यात आलेली आहे. या घटनेत जे-जे आरोपी असतील त्याला शासन व्हायला पाहिजे. आमचं महायुतीचं सरकार जर हे करू शकलं नाही तर तो ठपका आमच्यावर पडेल”, असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्रीही बीडच्या प्रकरणावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
धनंजय मुंडेंबाबत हसन मुश्रीफ काय म्हणाले होते?
दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच वाल्मिक कराड यांना मंत्री धनजंय मुंडे हे वाचवत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे यावरून बीड जिल्ह्यात चांगलंच राजकार तापलं आहे. तसेच विरोधकांनी धनजंय मुंडे यांच्यावर आरोप करताना असंही म्हटलं आहे की, धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने वाल्मिक कराडला संरक्षण मिळतं आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपी करण्यात यावं आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. मात्र, धनंजय मुंडेंच्या यांच्या राजीनाम्यासंदर्भातील विरोधकांच्या मागणीवर राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील भाष्य केलं. हसन मुश्रीफ यांनी म्हटलं की, जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नाही”, असं त्यांनी म्हटलं होतं.