राज्यात सत्तांतर झाल्यानंतर साधारण महिनाभराने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिंदे गटात मोठी नाराजी दिसली. याच कारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावेळी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात माझे नाव होते. मात्र काही नेत्यांनी मंत्रिपदाची मागणी केल्यामुळे माझे नाव बाद झाले, असे भरत गोगावले म्हणाले आहेत. ते दापोलीमध्ये एका सभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील विधान केले.
हेही वाचा>>> शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही! ; ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात माझे नाव होते. मात्र नंतर ते बाद करण्यात आले. तेव्हा एक-दोघांनी मंत्रिपदाची मागणी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडे पाहिले आणि सांगितले की, जेव्हा शिवाजी महाराज अडचणीत होते, तेव्हा तानाजी मालुसरे धावत आले होते. आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे, असे तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांना सांगितले होते. त्यावेळी मी म्हणालो की काही हरकत नाही. त्याच भूमिकेतील मी माणूस आहे, असे भरत गोगावले म्हणाले.
हेही वाचा>>> “आदित्य ठाकरेंनाच शंभर खोके घ्यायची सवय, त्यांची पोलखोल करणार; रामदास कदमांचे टीकास्त्र
पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारादरम्यान, शिंदे गटात चांगले नाराजीनाट्य रंगले होते. काही नेत्यांनी मंत्रीपद मिळालेले असूनही चांगले खाते न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. आमदार संजय शिरसाट यांनी थेट पत्रकार परिषद घेत नाराजीबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेनेतील बंडावेळी त्यांच्यासोबत काही अपक्ष आमदारही आले होते. मात्र त्यातील कोणालाच मंत्रीपद दिले गेले नाही. याच कारणामुळे माजी राज्यमंत्री तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही एकनाथ शिंदे आणि भाजपावर जाहीर टीका केली होती. पुढे पावसाळी अधिवेशनातही त्यांनी शिंदे गट-भाजपाला लक्ष्य केले होते. दरम्यान, आता सर्वांनाच दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. यावेळी नाराजांना संधी दिली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.