गेल्या दोन दिवसांपासून लोकप्रियतेवरून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, अशी जाहिरात कथित शिंदे गटाकडून दिली होती. “राष्ट्रामध्ये मोदी अन् महाराष्ट्रामध्ये शिंदे” असा मजकूरही या जाहिरातीत छापला होता. या जाहिरातीवरून शिंदे गट व भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पार्टीचे खासदार अनिल बोंडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली. “बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही,” अशा शब्दांत अनिल बोंडेनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं. बोंडे यांच्या टीकेवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “बेडूक कितीही फुगला तरी…”, भाजपा खासदाराचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

अनिल बोंडेंच्या टीकेबद्दल विचारलं असता भरत गोगावले म्हणाले, “आता मगाशी माझी उपमुख्यमंत्र्यांबरोबर याबद्दल चर्चा झाली आहे. त्यांनी तिथूनच त्या लोकांना फोन करून काय सांगायचंय ते सांगितलं आहे. त्यामुळे आता आम्ही त्या खोलात जास्त शिरत नाही. वरच्या स्तरावर याचा विचार केला जाईल. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल.”

अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले?

शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले, “खरं म्हणजे आपल्या विदर्भात एक म्हण आहे. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील, असं मला वाटतंय. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये. उद्धव ठाकरेंना वाटत होतं की, मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथ शिंदेंना वाटायला लागलं की, ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. पुढच्या काळात शिवसेनेला (शिंदे गट) वाटचाल करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचं आणि जनतेचं मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat gogawale reaction on anil bonde statement eknath shinde called him frog rmm
Show comments