Bharat Gogawale : महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आहे. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तसंच अजित पवार या तिघांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १५ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण खातेवाटप जाहीर झालं नव्हतं. आता २१ डिसेंबरच्या रात्री खातेवाटप जाहीर झालं आहे. खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्री पदावरुन दावे केले जात आहेत. शिवसेनेचे भरत गोगावले यांनी रायगडचं पालकमंत्रिपद आपल्याला मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खातेवाटप होताच रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा

मला मंत्रिपद मिळाल्याने मी समाधानी आहे. मुंबईत आल्यानंतर आम्ही सगळेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळी गेलो होतो. तिथे जाऊन आम्ही दर्शन घेतलं. यानंतर आम्ही आता बाळासाहेब भुवन या ठिकाणी आलो आहोत. मी आनंदी आहे, तसंच आमचे कार्यकर्तेही उत्साहात आहेत असं भरत गोगावलेंनी म्हटलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावर आमचा दावा असणार आहे, त्याची काही काळजी करु नका ते देखील होईल असं सूचक वक्तव्य भरत गोगावलेंनी केलं आहे.

सुनील तटकरे आणि भरत गोगावले वादाची पार्श्वभूमी काय?

महाविकास आघाडीच्या काळात आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यावेळी शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. तसंच भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातला वादही तेव्हा समोर आला होता. महायुतीचं सरकार जेव्हा राज्यात आलं तेव्हा म्हणजेच २०२२ मध्ये उदय सामंत यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रिपद गेलं. त्यानंतर २०२३ मध्ये अजित पवारही त्यांच्या आमदारांसह महायुतीत सहभागी झाले. आता रायगडच्या पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच पाहण्यास मिळते आहे. भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. मात्र खासदार सुनील तटकरे हे त्यांच्या कन्या आणि मंत्री आदिती तटकरेंना हे पद मिळावं यासाठी आग्रही आहेत. आता या सगळ्या दरम्यान नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान खातेवाटप जाहीर होताच भरत गोगावले यांनी पालक मंत्री पदावर दावा सांगितला आहे.

१८ डिसेंबरला महेंद्र थोरवे काय म्हणाले होते?

२०१९ ला महेंद्र दळवी, भरत गोगावले आणि मी असे शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते. तरीही उद्धव ठाकरे यांनी स्वतः ला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून, राष्ट्रवादीच्या एकमेव आमदारांना पालकमंत्री केले. त्यामुळे पुढील काळात झालेल्या बंडखोरीत आम्ही तिनही आमदारांनी एकनाथ शिंदेंसह ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे भरत गोगावलेच झाले पाहिजेत, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. तरंच आमच्या उठावाला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल, असं महेंद्र थोरवे म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat gogawale said my first claim for raigad gurdian minster post challenge for aditi tatkare scj