महाराष्ट्रात तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली चालू असल्याचं सांगितलं जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत. आतापर्यंत दोन वेळा या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या दोन्ही मंत्रिमंडळ विस्तारात महाडचे आमदार भरत गोगावले यांची संधी हुकली आहे. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचं नाव पक्कं मानलं जात होतं. परंतु, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. त्यामुळे भरत गोगावलेंवर अन्याय झाल्याची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा भरत गोगावले यांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. येत्या ७ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाची तारीख जवळ येऊ लागल्याने पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार आणि भरत गोगावलेंच्या मंत्रीपदाची चर्चा रंगू लागली आहे. यावर स्वतः भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मंगळावीर (२८ नोव्हेंबर) सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी गोगावले म्हणाले, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला अजून बराच वेळ आहे. आज २८ तारीख आहे, अधिवेशनाला नऊ दिवस बाकी आहेत. या नऊ दिवसांत काय घडेल हे आपण सांगू शकत नाही. शपथविधीसाठी आमचे कोट तयार आहेत. तुम्ही त्याची काळजी का करता? देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा ते कोट बाहेर काढू. त्यामुळे कोणी काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही शिवसैनिक नेहमी तयारीतच असतो.
हे ही वाचा >> “मीच भुजबळांना तुरुंगातून बाहेर काढलं”, प्रकाश आंबेडकरांचा दावा; म्हणाले, “मी त्या न्यायाधीशाला…”
भरत गोगावले म्हणाले, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी आत्ता सांगितलं तर या क्षणालासुद्धा आमची शपथ घेण्याची तयारी आहे. मंत्रीपदाबाबत मी शंभर टक्के आशावादी आहे. आम्ही आशावादी का नसावं? आम्ही काम करतोय. काम करणाऱ्या माणसाने आशावादी राहू नये का? मग कोणी आशावादी राहावं, काम न करणाऱ्यांनी आशावादी राहावं का?