शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपाने मिळून राज्यात सत्तास्थापन केल्यापासून रायगडचे आमदार भरत गोगावले (शिंदे गट) मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार स्थापनेपासून राज्यात दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु, दोन्ही वेळा भरत गोगावले यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. आता तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असून यावेळी पुन्हा एकदा गोगावले यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. यावर स्वतः आमदार गोगावले यांनी भाष्य केलं आहे. आमदार भरत गोगावले म्हणाले, मंत्रिपद मिळेल तेव्हा मिळेल, आम्ही आता विचारायचं बंद केलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात गोगावले यांचं नाव पक्कं मानलं जात होतं. परंतु, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे भरत गोगावले यांच्यावर अन्याय झाल्याची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, अधिवेशनासाठी नागपूरच्या विधीमंडळात दाखल झालेल्या आमदार गोगावले यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी गोगावले यांना मंत्रिपदाबाबत विचारल्यावर ते म्हणाले, “मंत्रिपदाचं होईल तेव्हा होईल. आम्ही आता विचारायचं थांबवलं. तुमची (प्रसारमाध्यमांची) सूत्रं रोज काहीतरी सांगत असतात. मंत्रिपदाबाबत निर्णय होईल तेव्हा होईल. ते तुम्ही सूत्रांनीच ठरवावं.” यावेळी गोगावले यांना विचारण्यात आलं की, माध्यमांच्या सूत्रांमुळे तुम्हाला त्रास होतो की मनात लाडू फुटतात? यावर आमदार गोगावले म्हणाले, लाडू फुटतात, पण त्या लाडूला गोडी नसते. ते बिगरसाखरेचे लाडू असतात. त्यामुळे त्यात साखर टाका आणि गोड काय ते आम्हाला सांगा. आम्ही तुमचं स्वागत करू.
हे ही वाचा >> “…अन्यथा तुमच्या कुटुंबीयांची SIT चौकशी लावू”, उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा
मंत्रिपदाच्या शक्यतांबाबत भरत गोगावले यांनी गेल्या आठवड्यात अलिबाग येथे एका कार्यक्रमात भाष्य केलं होतं. गोगावले म्हणाले होते, सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचं राहिलं आहे. काय अडचण आहे ते बघावं लागेल, मानपान राहिला असेल तर तोही करावा लागेल. मला अजूनही मंत्रिपदाची आशा आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे.