शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सध्या कुटुंब संवाद दौरा चालू आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रायगड येथील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा नेत्यांनी ज्या विरोधकांवर हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप केले त्याच विरोधकांना आता आपल्या पक्षात येण्यासाठी, सत्तेत सामील होण्यासाठी निमंत्रण मिळतंय. मंत्री, उपमुख्यमंत्री आणि थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली जात आहे. तुम्ही आमच्याकडे आल्यावर तुम्हाला मंत्रिपद मिळणारच आणि हीच मोदींची गॅरंटी आहे असं सांगितलं जातंय. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाडचे आमदार आणि शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनाही टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांनी भरत गोगावले यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली. तसेच त्यांचा ‘स्वप्नातील पालकमंत्री’ असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे म्हणाले, नॅपकिन घामाने भिजले पण मंत्रीपद मिळत नाही. ते हल्ली झेंडे सोडून नॅपकिन फिरवतात. आमदार भरत गोगावले हे गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, मंत्रिपद न मिळाल्याने ते राज्य सरकारवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी गोगावले यांना टोला लगावला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भरत गोगावले यांनी आज (४ फेब्रुवारी) उत्तर दिलं.
भरत गोगावले यांनी आज महाड येथे एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. गोगावले म्हणाले, परवा उद्धव ठाकरे, माजी खासदार अनंत गीते यांची रायगड येथे सभा पार पडली. पोलादपूर, माणगाव, रोहा, पेण आणि अलिबागलाही ते येऊन गेले. त्यांनी अनेक सभादेखील घेतल्या, त्यांनी सभा घ्याव्यात. आमचा त्यावर काही आक्षेप नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहोत.
हे ही वाचा >> महात्मा जोतीराव फुले यांना भारतरत्न कशाला? छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले…
भरत गोगावले म्हणाले, मी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून शिवसेनेबरोबर काम करतोय आणि राजकारणात सक्रीय आहे. मी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पंचायत समितीचा अपक्ष सदस्य बनण्यापासून जिल्हा परिषदेचा दोन वेळा सदस्य आणि दोन वेळा सभापतीदेखील झालो. माझी पत्नी देखील दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य होती. मी आतापर्यंत तीन वेळा आमदार झालो आहे. आता हे लोक टकमक टोकावरून ढकलून देण्याची भाषा करत आहेत. माझ्या नॅपकिनवर टीका करत आहेत. माझा नॅपकिन अनेकांना सलतोय. माझ्या नॅपकिनमध्ये जादू आहे. ती जादू मी तुम्हा सर्वांना सांगणार नाही. त्यात काय जादू आहे ती केवळ मीच करतो.