खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत बोलताना आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. याच कारणामुळे भाजपा, शिंदे गट आणि मनसेचे नेते राहुल गांधींविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या पक्षांकडून भारत जोडो यात्रेलाही विरोध केला जात आहे. दरम्यान, ही यात्रा बुलढाण्यात असताना राहुल गांधी यांच्या सभेदरम्यान एक विचित्र प्रकार घडला आहे.
हेही वाचा >>> कोश्यारींच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानानंतर संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले “आम्ही लवकरच…”
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या बुलढाण्यात आहे. यावेळी येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सभेदरम्यान, कृषी कायद्यांना विरोध करताना मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राहुल गांधी मंचावर उभे राहिले होते. मात्र एकीकडे काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांना श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे शांतपणे उभे राहिलेले असताना दुसरीकडे सभेपासून काही अंतरावर फटाके फोडण्यात आले. अज्ञात व्यक्तींच्या या कृतीमुळे काँग्रेसकडून संताप व्यक्त करण्यात आला.
हेही वाचा >>> ‘भारत जोडो यात्रे’त सावरकरांचा मुद्दा काढणे गरजेचे होते का? नाना पटोलेंनी मांडली भूमिका, म्हणाले “६० रुपये पेन्शन…”
शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात असताना दुसरीकडे काही अंतरावर फटाके फोडले जात होते. फटाक्यांचा आवाज येत होता. यालाच राहुल गांधी यांनी आक्षेप घेत काँग्रेसच्या अन्य नेत्यांना फटाके वाजवणे थांबवावे असे आवाहन करण्यास सांगितले. मात्र तरीदेखील फटाके वाजतच राहिले. त्यानंतर काँग्रेसने या घटनेचे तीव्र निषेध केला. तसेच फटाके फोडण्याचे खोडसाळ काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली.
हेही वाचा >>> आधी आदित्य ठाकरे म्हणाले “…म्हणून टेंडर रद्द केले का?” आता नितेश राणेंचे जशास तसे उत्तर; म्हणाले “उद्धव सेनेतील युवराजांची…”
आम्ही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. येथे शेतकऱ्यांची अवजारे आहेत. मागे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. काल राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता फटाके वाजवले जात आहेत. शेतकऱ्यांच्या बलिदानाला आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत,” असे म्हणत काँग्रेसच्या एका नेत्याने फटाके फोडण्याच्या कृतीचा निषेध केला.