तुकाराम झाडे / संजीव कुळकर्णी
हिंगोली, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार मुक्काम, १०० कि.मी. हून जास्त अंतराचा प्रवास, हजारो लोकांशी संवाद, जाहीर सभा आदी माध्यमांतून ‘नफरत छोडो, भारत जोडो’चा संदेश देत काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी आणि इतर भारतयात्री शुक्रवारी दुपारनंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे दाखल झाले. स्वागताला मोठी गर्दी होती. हिगोली जिल्ह्यातील यात्रेच्या पहिल्या टप्प्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील स्वागताची जबाबदारी अमित देशमुख यांच्यावर असल्याने लातूर जिल्ह्यातील १५ हजार कार्यकर्त्यांची गर्दी होती.
नांदेड जिल्ह्यात यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते अमित देशमुख, धीरज देशमुख किंवा परिवारातील सदस्य सहभागी झाले नाहीत. अमित देशमुख यांच्यावर हिंगोली जिल्ह्यातील तयारीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात लातूर व औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यापासून ते यात्रेतील सहभागी व्यक्तींना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात जातीने लक्ष घालत आहेत. हिंगोली जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान राज्यातील अनेक लेखकही सहभागी होणार आहेत. यात्रेत दुपारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली.
धाब्यावर अल्पोपहार.. गुरुवारी सायंकाळी नांदेड शहरात झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केल्यानंतर खा. राहुल गांधी हे दाभड येथे मुक्कामासाठी पोहोचले. शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता दाभड येथून त्यांची पदयात्रा सुरू झाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय निरूपम यांची उपस्थिती होती. ही पदयात्रा अर्धापूरमार्गे मक्ता पार्डी येथील किशोर स्वामी यांच्या फार्म हाऊसवर विश्रांतीसाठी थांबली होती. मध्ये एका धाब्यावर राहुल गांधी यांनी अल्पोपहार घेतला. या यात्रेत जागोजागी भारतयात्री व कार्यकर्त्यांसाठी अर्धापूरची प्रसिद्ध केळीवाटप करण्यात आली.