जीवे मारण्यात येत असलेल्या धमक्या आणि त्यासंदर्भात होणारे लिखाण याच्या निषेधार्थ २४ मार्च रोजी येथील शाहूपुरीतील सनातन प्रभात वृत्तपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे पुरोगामी चळवळीतील नेते भारत पाटणकर यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पाटणकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. ते म्हणाले, १६ मार्च रोजी माझ्या घरी सनातन प्रभात वृत्तपत्र न मागता पाठवण्यात आले होते. त्यामध्ये माझ्याविषयी असभ्य स्वरूपाचे लिखाण केले होते. त्याआधी जुलै २०१४ मध्ये एक पत्र आले होते. त्यामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी, ब्राह्मण यांच्याविषयी बोलता आणि मुस्लिमांचे लाड का करता, असा उल्लेख करीत जाब विचारला होता. तर २ फेब्रुवारी रोजी आणखी एक सविस्तर पत्र आले होते. त्यामध्ये तुम्ही धरणग्रस्तांसाठी केलेले काम चांगले आहे. पण त्यापुढे जाऊन तुम्ही गोविंदराव पानसरे, निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांच्या मार्गाने जात आहात असे नमूद केले होते. हा प्रकार धमकी देण्यातला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे लिखाण का केले आणि ते कशाच्या आधारे केले याची विचारणा करण्यासाठी आपण २४ मार्च रोजी सनातन संस्थेच्या सनातन प्रभात वृत्तपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत असे पाटणकर यांनी सांगितले. या वेळी संपत देसाई, अनिल म्हमाणे उपस्थित होते.
भारत पाटणकरांचा २४ मार्च रोजी ‘सनातन प्रभात’वर मोर्चा
जीवे मारण्यात येत असलेल्या धमक्या आणि त्यासंदर्भात होणारे लिखाण याच्या निषेधार्थ २४ मार्च रोजी येथील शाहूपुरीतील सनातन प्रभात वृत्तपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे भारत पाटणकर यांनी सांगितले.
First published on: 20-03-2015 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat patankar front on sanatan prabhat on 24 march