जीवे मारण्यात येत असलेल्या धमक्या आणि त्यासंदर्भात होणारे लिखाण याच्या निषेधार्थ २४ मार्च रोजी येथील शाहूपुरीतील सनातन प्रभात वृत्तपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे पुरोगामी चळवळीतील नेते भारत पाटणकर यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून पाटणकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. ते म्हणाले, १६ मार्च रोजी माझ्या घरी सनातन प्रभात वृत्तपत्र न मागता पाठवण्यात आले होते. त्यामध्ये माझ्याविषयी असभ्य स्वरूपाचे लिखाण केले होते. त्याआधी जुलै २०१४ मध्ये एक पत्र आले होते. त्यामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी, ब्राह्मण यांच्याविषयी बोलता आणि मुस्लिमांचे लाड का करता, असा उल्लेख करीत जाब विचारला होता. तर २ फेब्रुवारी रोजी आणखी एक सविस्तर पत्र आले होते. त्यामध्ये तुम्ही धरणग्रस्तांसाठी केलेले काम चांगले आहे. पण त्यापुढे जाऊन तुम्ही गोविंदराव पानसरे, निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांच्या मार्गाने जात आहात असे नमूद केले होते. हा प्रकार धमकी देण्यातला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे लिखाण का केले आणि ते कशाच्या आधारे केले याची विचारणा करण्यासाठी आपण २४ मार्च रोजी सनातन संस्थेच्या सनातन प्रभात वृत्तपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत असे पाटणकर यांनी सांगितले. या वेळी संपत देसाई, अनिल म्हमाणे उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा