हजारो लिटर डिझेल वाया; इंधन पुरवठय़ावर परिणाम

भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई-पानेवाडी (मनमाड) या इंधन वाहिनीला पांढुर्ली येथे गळती होऊन हजारो लिटर डिझेल वाया गेले. ज्या ठिकाणी ही गळती झाली, तिथे जल वाहिनीच्या बाह्य़ सुरक्षतेसाठी अलीकडेच प्रशासनाने डिझेल गळतीची प्रात्यक्षिके घेऊन सुरक्षिततेचा आढावा घेतला होता. उपरोक्त घटनेमुळे खळबळ उडाली असून मनमाड डेपोत नेमके किती डिझेल कमी आले याची माहिती देण्यास प्रशासनाने नकार दिला. या घटनेमुळे मनमाड डेपोतून होणाऱ्या इंधन वितरणावर परिणाम झाला आहे.

भारत पेट्रोलियम कंपनीने इंधन वितरणासाठी मुंबई-पानेवाडी (मनमाड) अशी भूमीगत २५२ किलोमीटर लांबीची व १८ इंची वाहिनी टाकली आहे. आशिया खंडातील हा दुसरा प्रकल्प आहे.

या वाहिनीद्वारे मुंबईहून पेट्रोल, डिझेल व घासलेटचे वहन केले जाते. पानेवाडी येथे कंपनीचा सर्वात मोठा प्रकल्प असून अती उच्च क्षमतेच्या टाक्यांमध्ये वाहिनीतून आलेले इंधन साठवून टँकर व रेल्वे वाघिणीद्वारे संपूर्ण भारतात वितरीत केले जाते. मुंबई-मनमाड वाहिनीसाठी सुरक्षेची अत्याधुनिक साधने उपलब्ध करून दिली आहेत. वाहिनी वितरण यंत्रणा स्वयंचलित आहे. वर्षांतून तीन वेळा या प्रकल्पात सुरक्षेची प्रात्यक्षिके घेतली जातात. पण ती अंतर्गत असतात. यंदा प्रथमच बाह्य़ सुरक्षेचा आढावा म्हणून नांदगाव आणि येवला तालुक्याच्या सीमेवर सुरक्षेची प्रात्यक्षिके घेत ही व्यवस्था सक्षम असल्याचे दाखविले गेले. पण शुक्रवारी सकाळीच नाशिकजवळ पांढुर्ली येथे वाहिनी फुटून हजारो लीटर डिझेल वाया गेले.

दुरुस्तीचे काम हाती

या ठिकाणी जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असतांना ही इंधन वाहिनी फुटली. प्रशासनाने तातडीने तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे मनमाडला होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा परिणाम इंधन पुरवठय़ावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भात इंधन वाहिनीची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.

Story img Loader