नागपूर : तेलंगणपेक्षा महाराष्ट्रात नैसर्गिक संपदा जास्त आहे. पण, तरीही येथे शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात. ही स्थिती बदलण्यासाठी आमचा पक्ष महाराष्ट्रात सर्व निवडणुका लढवणार आहे. सत्ता प्राप्त केल्यानंतर येथे तेलंगणमधील कृषी प्रारूप लागू करू, त्याद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू आणि नंतर मध्य प्रदेशात पक्षविस्तार करू, अशी घोषणा तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी  गुरुवारी नागपुरात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात राव बोलत होते. ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृह तुडुंब भरले होते. तत्पूर्वी राव यांनी वर्धा मार्गावर पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले.

आपल्या देशात सुपीक भूप्रदेश, मुबलक पाणी, कोळसा आणि सर्वाधिक जनसंख्या आहे. पण, स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाले तरी अजूनही पाण्याची टंचाई आहे. शहरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही. दिल्लीसारख्या ठिकाणी चोवीस तास वीज मिळत नाही. अनेक भागात कुपोषणाची समस्या आहे. ही स्थिती बदलण्यासाठी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) संपूर्ण देशात परिवर्तन करण्याचे ध्येय घेऊन निघाली आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आहे. येथे सर्व स्तरावरील निवडणुका लढवण्यात येतील आणि त्यानंतर मध्यप्रदेशात प्रवेश केला जाईल, असेही राव म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपचे नाव न घेता या पक्षाचा समाचार घेतला. धर्म, जातीच्या नावाने समाजात फूट पाडून निवडणुका जिंकल्या जात आहेत. परंतु हा विजय केवळ त्या नेत्याचा, त्या पक्षाचा आहे. त्याचा लोकांना काहीच लाभ नाही. कर्नाटकात भाजपचा पराभव झाला आणि तेथे काँग्रेस पक्षाची सत्ता आली. म्हणजे नेते बदलले, पक्ष बदलला, पण जनतेला त्या सरकारकडून आशा-आकांक्षा पूर्ण होतील, असे अजिबात वाटत नाही, अशी टीकाही के. चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसवरही केली.

तेलंगणात शेतकरी आत्महत्या शून्यावर

नांदेड येथे आमची सभा झाली, तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमचे महाराष्ट्रात काय काम, असे म्हटले होते. त्यावर मी त्यांना तेलंगणचे कृषी प्रारूप स्वीकारा, महाराष्ट्रातून निघून जाईन, असे उत्तर दिले होते, असे के. चंद्रशेखर राव म्हणाले. तेलंगणमध्ये तलाठी हे पद रद्द केले. सर्व गोष्टी ऑनलाईन केल्या. शेतकऱ्यांना आता सात-बारासाठी कुठे जावे लागत नाही. शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज दिली. शेतकरी जे कोणते उत्पादन घेतील ते सर्वच्या सर्व राज्य सरकार खरेदी करते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचा पाच लाखांचा विमा सरकारने काढून दिला आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शुन्यावर आल्या आहेत, असा दावाही त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat rashtra samithi will contest all elections in maharashtra says k chandrasekhar rao zws
Show comments