प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा ‘स्माइल अॅम्बेसेडर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून त्यांची “स्माइल अॅम्बेसेडर” म्हणून नियुक्ती करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनं पुढच्या पाच वर्षांसाठी या अभियानात स्माइल अॅम्बेसेडरच्या स्वरूपात नियुक्त होण्यास सहमती दर्शवली आहे. स्वच्छ मुख अभियान दूरपर्यंत पसरेल आणि त्याला चांगला पाठिंबा मिळेल, असंही सचिन तेंडुलकरचं म्हणणं आहे. यासंदर्भात आज झालेल्या कार्यक्रमात बोलताना सचिन तेंडुलकरनं गुटखा, तंबाखू अशा गोष्टींपासून लांब राहण्याचं आवाहन उपस्थितांना केलं आहे.
सचिन तेंडुलकरनं अभियानाचे स्माइल अॅम्बेसेडर होण्याचे मान्य केल्यामुळे या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यात मौखिक आजार वाढत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मौखिक आरोग्याबाबत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचं ठरवलं आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. ‘स्वच्छ मुख अभियान’ हा चांगला उपक्रम असून असे अभियान निरंतर राबवावे, असंही राज्यपाल त्यावेळी म्हणाले होते. राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.