अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे स्थळ अजून ठरले नसले तरी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी मात्र सुरू झाली आहे. प्रसिद्ध कथा व कादंबरीकार भारत सासणे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. अध्यक्षपदाच्या रिंगणात आपण उमेदवार असल्याच्या चर्चेला सासणे यांनीही दुजोरा दिला. गेल्या वर्षीच या पदासाठी अर्ज करणार होतो, मात्र फ. मुं. शिंदे यांच्यासाठी माघार घेतली. या वेळी मात्र निवडणुकीच्या रिंगणात असेन, असे सासणे म्हणाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात श्रीपाद सबनीस यांचेही नाव चर्चेत आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेची बैठक रविवारी येथे घेण्यात आली. बैठकीत साहित्यसंमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण मतदार असतील, याची यादी निश्चित करण्यात आली. बैठकीला डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासह मराठवाडय़ातील कार्यकारिणीचे २१ सदस्य उपस्थित होते. बैठकीत सासणे यांच्या नावाची अनौपचारिक चर्चा झाली. वसमत येथे झालेल्या मराठवाडा साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद सासणे यांनी भूषविले. मराठवाडय़ात अनेक वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून सासणे यांनी काम केले. त्यामुळे त्यांचा विदर्भ व मराठवाडय़ात जनसंपर्क असल्याचे सांगितले जाते. नुकतेच महामंडळातील पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन कोठे घ्यावे, याची चाचपणी करण्यासाठी उस्मानाबाद येथे दौरा केला. पंजाब, बडोदा किंवा उस्मानाबाद या तीनपैकी एका ठिकाणी साहित्यसंमेलन होईल, असे सांगितले जाते. मात्र, उस्मानाबादच्या मसाप शाखेकडून आग्रहाचे निमंत्रण आहे. पंजाबमध्ये संमेलन घेतल्यास पुस्तक खरेदी-विक्री व्यवसायावर त्याचा परिणाम होईल. बडोद्यातही किती प्रकाशक जातील, यावर शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळे उस्मानाबाद येथे संमेलन होईल, असा दावा केला जात आहे. महामंडळाच्या पदाधिकारी माधवी वैद्य यांनीही उस्मानाबाद येथे संमेलन घेण्यास फारशी कोणाची हरकत असणार नाही, असे उस्मानाबाद येथे सांगितले होते.

Story img Loader