लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झालं. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. या दिग्गज नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे आणि जालना मतदारसंघामधून रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाचा दौरा सुरू करत कामाला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा नेते, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. ‘आपल्याला पक्षाने सरपंच होण्यास सांगितले तरी आपण सरपंच होऊ’, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : संजय राऊत यांचं मोठं विधान, “नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात आपलाच मुख्यमंत्री”

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“मी ३५ वर्षे आमदार, खासदार राहिलो. आता पक्षाने जर मला गावचा सरपंच होण्यास सांगितलं तर मी गावचा सरपंच होईन. कारण गावचा सरपंच झालं तर गावचा विकास तरी करता येईन”, असं रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

मतदारसंघाचा दौरा

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. मात्र, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे महायुतील मोठा धक्का बसला. यानंतर आता महायुतीच्या जागा का कमी निवडून आल्या? यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे. तसेच भाजपाच्यावतीने महाराष्ट्रभर चिंतन बैठकी सुरु आहेत. या अनुषंगाने रावसाहेब दानवे हे देखील मराठवाड्यातील काही मतदारसंघात दौरे करत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. तसेच या माध्यमातून विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा देखील घेतला जात आहे.

रावसाहेब दानवेंच्या विरोधात कोण होतं?

लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून रावसाहेब दानवे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते डॉ.कल्याण काळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे रावसाहेब दानवे यांना धक्का बसला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharatiya janata party tells me i will become sarpanch raosaheb danve statement gkt
Show comments