झटपट कर री कृपा भवानी माँ, रोट चढाऊँ तुझे।
सुसर मेरा गांव गया है, उधर खपा दे उसे।।
सासू मुझको बहुत सताती उपर बुलाले उसे।
हिंदीमधील या ओळी वाचल्यावर संत एकनाथांचे भारुड तोंडी आले ना?
‘सत्वर पाव ग भवानी आई रोडगा वाहीन तुला’ भारुडातील भाषेचा हा गोडवा आध्यात्मिक. मात्र, सांगण्याची नाथांची हातोटी विचार करायला लावणारी. मराठी भाषेचा हा गोडवा हिंदी भाषिकांना कळावा, म्हणून प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांनी एकनाथ महाराजांच्या भारुडाचा अन्वयार्थ अनुवादित केला आहे. काही पद्यानुवाद आणि काही रचनांचे अर्थ सांगणारे पुस्तक प्रथमच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन औरंगाबाद येथे होणार आहे.
मराठी भाषेतील नावाजलेल्या छावा, पाचोळा, श्रीमान योगी या कादंबऱ्यांसह, संत साहित्य िहदी भाषेत नेताना प्राचार्य वेदालंकार यांनी संत तुकाराम गाथा पद्यानुवाद, महात्मा फुले यांच्या साहित्याचा अनुवाद केला. गेल्या काही दिवसात त्यांनी मराठीतील तीन संगीत नाटकांचा अनुवाद केला. कटय़ार काळजात घुसली, संगीत सौभद्र, संगीत शारदा ही नाटके आता िहदी भाषिकाला बसविता येतील. मराठी संस्कृतीची ओळख िहदी भाषिक व्यक्तींना व्हावी, या साठी त्यांनी सुरूकेलेल्या कार्याचा भाग म्हणून भारुड त्यांनी अनुवादित केले. ६६ भारुडांचा अनुवाद करताना त्या काळातील भाषेला पर्यायी शब्द शोधणे, त्याचा आध्यात्मिक अर्थ समाजावून सांगणे असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. कानपूरच्या विकास प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
नाथांचे भारुड महाराष्ट्रात नेहमीच आवडीने ऐकण्याचा विषय. ‘बहुरूढ’ अशी भारुड शब्दाची व्युत्पत्ती. दोन तोंडाचा पक्षी अशी रचना असल्याने भारुडाचे अर्थही दोन अंगाने जाणारे. तसा ऐकायला चटपटीत वाटणारा मजकूर विचार करायला भाग पाडणारा. चाली, रुढी, प्रथा, परंपरा आणि ठासून भरलेली वक्रोक्ती यामुळे मराठी माणसाच्या मनात असणारे भारुड हिंदी भाषिकांपर्यंत पोहोचविणे हे अवघड काम होते. त्यामुळे प्रत्येक भारुडाचा अर्थ वेदालंकार यांनी दिला आहे.
तशी एकनाथांच्या अभंगांची संख्या ३०० पेक्षा अधिक. त्यातील ६६ लोकप्रिय भारुडांचा हिंदी अनुवाद करण्यात आला आहे. दादला नको गं बाई, विंचू चावला, पाखरू, पोपट, बाजार, जोहार यासह अनेक लोकप्रिय भारुडांचा अनुवाद पुस्तकात देण्यात आला आहे. काही भारुडांचा पद्यानुवादही त्यात आहे. मराठी संस्कृतीत कुडमुडे जोशी, कोलाटी भुत्या अशा वेगवेगळ्या जातींमधील केलेली भारुडेही या पुस्तकात आवर्जून उल्लेखलेली आहेत. प्राचार्य वेदालंकार यांनी आतापर्यंत संतसाहित्याचा अनुवाद केला असल्याने भाषिक अर्थाने केलेला हा वेगळा प्रयोगही महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
एकनाथांच्या भारुडाचा गोडवा आता हिंदीत!
झटपट कर री कृपा भवानी माँ, रोट चढाऊँ तुझे। सुसर मेरा गांव गया है, उधर खपा दे उसे।। सासू मुझको बहुत सताती उपर बुलाले उसे। हिंदीमधील या ओळी वाचल्यावर संत एकनाथांचे भारुड तोंडी आले ना?
आणखी वाचा
First published on: 10-07-2014 at 01:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharud of sant eknath in hindi