अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना फोडून भाजपाच्या सोबतीला गेलेल्या शिंदे गटाला भाजपाचा वाण नाही, पण गुण लागला, असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली.
हेही वाचा – “अब्दुल सत्तार चुकीचंच बोलले, पण…”, सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!
काय म्हणाले भास्कर जाधव?
“कालचे अब्दुल सत्तारांचे वक्तव्य हे केवळ निषेध करण्यापुरते मर्यादित नाही. एका बाजुला एकनाथ शिंदे यांनी त्यांना माफी मागायला सांगितली, अशा बातम्या आल्या आहेत. तर त्याचवेळी अब्दुल सत्तार हे सिल्लोडमध्ये स्वत:वर स्तुतीसुमनं उधळत होते. त्यामुळे त्यांना खरचं माफी मागयला सांगितली की हा फक्त देखावा होता, हे स्पष्ट होण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
“शिंदे गटातील लोक ज्या प्रकारे भाषा वापरत आहेत. पण त्यापूर्वी भाजपाची भाषाही विसरून चालणार नाही. भाजपाचे नेते स्वत: शांत राहतात आणि त्यांच्या जोडीला जे जाऊन बसतात, त्यांना बोलतं करतात. त्यामुळे शिंदे गटातील लोक जे बोलत आहेत. त्यांच्या मागे कोणत्या भाजपाच्या नेत्याचे डोके आहे का? हे तपासण्याची आवश्यकता आहे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – “मारहाणीचं समर्थन करत नाही, पण…”; ठाण्यातील मॉलमध्ये झालेल्या राड्यावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
“नवनीत राणा असतील किंवा रवी राणा असतील यांनी कोणत्या भाषेत प्रतिक्रिया दिल्या आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यांना भाजपाने कधीही थांबवले नाही. भाजपा हा सुसंस्कृत आणि ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ अशी बिरुदावली मिरवणारा पक्ष आहे. मात्र, सत्ता गेल्यानंतर त्यांनी सर्व ताळतंत्र सोडलं आणि आत शिवसेना फोडून त्यांच्या सोबतीला एकनाथ शिंदे यांचा गट गेला आहे. त्यांना आता वाण नाही, पण गुण लागला, असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.