राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. याआधी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. यावेळी भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदूहृदयसम्राट’ असा केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका होत आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार भास्कर जाधव यांनीही मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपावर हल्लाबोल केला आहे. “ही भाजपाची नामुष्की आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हयात असताना नरेंद्र मोदींना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पण, ते होऊ शकले नाही. एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची तुलना करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. तर, ही वाईट अवस्था आहे.”
“भाजपाच्या कुबड्यांवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत”
“एकनाथ शिंदेंना भाजपाचा प्रचार करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण, भाजपाच्या कुबड्यांवर ते मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजपा सांगेल, ते एकनाथ शिंदेंना करावे लागेल,” असा टोलाही भास्कर जाधवांनी लगावला आहे.
“कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही”
“बाप चोरला, पक्ष चोरला आता निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. कारण, किती देखावा करणार? काहीही केलं, तरी कपाळावरील गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. सरकार ३१ डिसेंबरला पडणार म्हणजे पडणारच,” असं टीकास्र शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर डागलं आहे.