अलीकडे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली होती. या सभेत उद्धव ठाकरे शिंदे गटाचा समाचार घेतला होता. त्या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ( शिंदे गट ) आज ( १९ मार्च ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेचं आयोजन केलं आहे. पण, या सभेपूर्वी खेडमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या बॅनरची चर्चा रंगली आहे.
ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा झाली होती, तिथेच एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार आहे. सभेसाठी दोन दिवसांपासून गोळीबार मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. अशात खेडमधील रामदास कदमांच्या बॅनरने चर्चांना उधाण आलं आहे. ‘विरोधकांच्या मनात नुसती आग कारण मैदानात उतरला आहे, ढाण्या वाघ,’ ‘करार जबाब मिलेगा’, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदमांची खिल्ली उडवत टोले लगावले आहेत.
हेही वाचा : “भाजपाला आमची गरज नसेल, तर…”, महादेव जानकर यांचा इशारा
“रामदास कदम हे एका मतदारसंघापुरते मर्यादित”
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम. करारा जबाब देण्यासाठी तुमच्यात दम असायला लागतो. २००९ साली रामदास कदमांची पराभव मी नाहीतर उद्धव ठाकरेंची केल्याचा आरोप ते करत आहेत. दुसरं, योगेश कदमांची राजकीय कारकीर्द संपण्यासाठी उद्धव ठाकरेंची कट रचल्याचा आरोप रामदास कदमांनी केला. पण, रामदास कदम हे एका मतदारसंघापुरते मर्यादीत आहेत. हे काय करारा जबाब देणार.”
“निवडणुकीवेळी लोक हळूच टाचणी लावून…”
“त्यामुळे बेडूक कितीही फुगला तरीसुद्धा ती काय डोंगर किंवा बैल होऊ शकत नाहीत. रामदास कदम नावाची बेडूक किंवा शिंदे गट कोकणात बोलून फुगेल. निवडणुकीवेळी लोक हळूच टाचणी लावून हा फुगा फोडलीत,” असं टीकास्र भास्कर जाधव यांनी डागलं आहे.
“भास्कर जाधवांना आमदार होऊ देणार नाही”
दरम्यान, काल ( १८ मार्च ) रामदास कदमांनी भास्कर जाधवांना आव्हान दिलं होतं. “२०२४ ला भास्कर जाधवांनी आमदार होऊन दाखवावं. काहीही झालं तरी भास्कर जाधवांना आमदार होऊ देणार नाही. भास्कर जाधवांना राजकारणातून गाडल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा रामदास कदम यांनी दिला होता.