मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारलेल्या आमदार, मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव न वापरता जगून दाखवावे, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलं होते. त्यावर बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरूष होते. त्यांचं नाव वापरण्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही, असं प्रत्युत्तर शिंदे गटातील आमदारांनी दिलं होते. त्याचा आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी समाचार घेतला आहे.
“चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात केला. या बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरेंनी सांगितलं, बाळासाहेब ठाकरेंचं नाव न लावता आपल्या आई, वडिलांचं नाव लावा. त्यावर भाजपाच्या काही चाणक्यांनी बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते, हिंदूंचे तारणहार आहेत, असं म्हटलं. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना वडिलांच्या जागी मानता. तर, ४० गद्दार आमदारांनी आपल्या घरासमोरील पाटीवर बापाच्या जागी बाळासाहेब ठाकरेंचं नाव लिहावे,” असं आव्हान भास्कर जाधवांनी दिलं आहे.
“उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली…”
“शिंदे गटातील आमदार फक्त आणि फक्त आपलं पाप लपण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरत आहेत. उद्धव ठाकरेंना विश्वासघाताने मुख्यमंत्रीपदावरून तुम्ही खाली खेचलं आणि बाळासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटत नाही का,” असा सवालही भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांना विचारला आहे. ते हिंगोलीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.