दापोली : अवघा कोकण शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली येत असल्याचं चित्र आहे. आज दापोलीच्या १४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. इतकंच नाही तर आमदार भास्कर जाधव यांचे बंधू बाळाशेठ जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना माजी आमदार रामदास कदम म्हणाले की, आम्ही शिवसेनेत उठाव केला त्याला अनेक कारणे आहेत. आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला, पण मी उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातून त्यांना नाही उध्वस्त केल तर नाव रामदास कदम नाव लावणार नाही, असा घणाघात केला आहे. दापोली नगरपंचायतमधील ठाकरे गटातील नगरसेवक आणि शरद पवार गटातील नगरसेवक यांनी रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम महिला आघाडीच्या श्रेया कदम यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

रामदास कदम पुढे म्हणाले की, या जगातला कुठलाही पक्षप्रमुख असा नाही की आपल्याच आमदाराला संपवून टाकायचा इतका घाणेरडा विचार करेल, खालच्या पातळीचा विचार हा फक्त उद्धव ठाकरे यांनाच करता येऊ शकतो, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली आहे. तीन वर्षांपूर्वी याच उद्धव ठाकरे यांनी इथे दापोली, मंडणगडमध्ये काही सुभेदार पाठवले होते, व्यासपीठावरून सगळ्यांची हकालपट्टी केली, व्यासपीठावरूनच त्या सुभेदारांनी काही नियुक्ती केल्या असा आरोप त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी नव्हती, अशीही टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अनिल परब यांनाही सुनावलं आहे.

यावेळी योगेश कदम यांनी, बोलताना सांगितलं, की तीन वर्षापूर्वी अनिल परब यांनी येथे येऊन घाणेरडे राजकारण केले होते. शिवसेनेची एक हाती सत्ता येत असताना त्यांनी परस्पर हात मिळवणी केली. मात्र आज या सगळ्याला शिवसेनेत प्रवेश करून या १४ नगरसेवकांनी उत्तर दिलं आहे. आता पुढच्या दोन वर्षात दापोलीचा विकास केला जाईल. दोन वर्षानंतर होणार्‍या निवडणुकीचा निकाल आजच लागला आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशा शब्दात पक्षप्रवेश केलेल्या नगरसेवकांचा त्यांनी गौरव केला. दापोली नगरपंचायतमध्ये यापुढे लवकरच शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होईल, असे सांगत विद्यमान ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचे स्पष्ट संकेत योगेश कदम यांनी दिले आहेत.

Story img Loader