ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर गंभीर टीका केली जात आहे. आमदार भास्कर जाधव यांनीही गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केलेल्या भाषणात कोणते चिथावणीखोर वक्तव्य होते, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. मात्र गुन्हा दाखल झाला असेल तर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> समता पार्टीच्या ‘मशाल’ चिन्हावरील दाव्यानंतर उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय? भास्कर जाधव म्हणाले “हे चिन्ह आम्ही…”

शिवसेनेचे काम करायचे म्हणजे निखाऱ्यावरून चालावे लागते, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे निखाऱ्यावरून चालत असताना चटके बसणारच आहेत. आम्हाला फार काही चिंता नाही. तेव्हा जे भाषण झाले, त्यामध्ये काय चिथावणीखोरपणा आहे, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. तरीदेखील त्यांनी असा काही गुन्हा दाखल केला असेल, तर आम्ही त्याला कायद्याने उत्तर देऊ. आता महाराष्ट्रात गद्दारीच्या विरोधात जो राग निर्माण झाला आहे. जो आगडोंब उसळला आहे, तो अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून थांबणार नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा >>> “आमची मशाल ४० मुंडक्यांच्या रावणाला…”; मनिषा कायंदेंची शिंदे गटावर जोरदार टीका

आमच्यातील काही ठराविक लोकांवर गुन्हे दाखल करून हा वणवा विझणार नाही. हा विचारांचा वणवा दिवसागणिक वाढत जाईल. त्यामुळे असे गुन्हे दाखल करताना त्यांनी काही विचार करणे गरजेचे आहे. आज त्यांच्या बाजूला असलेले लोक उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही-बाही बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात समन्यायी प्रमाणात न्याय दिला पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav comment over case file for provocative speech prd